पुणे – गुगल मीटतर्फे (Google Meet) नवे फिचर अपडेट करण्यात आले आहे. या फिचरच्या माध्यमातून आयोजक (होस्ट) अधिक चांगल्या प्रकारे मीटिंग नियंत्रित करू शकणार आहे. याच्या आधीपर्यंत गुगल मीटच्या सर्व युजर्सकडे माइक आणि कॅमेरा कंट्रोल होता. त्यामुळे अनेक वेळा मीटिंगदरम्यान अडथळे निर्माण होत होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी आता कंपनीतर्फे होस्टकडे मायक्रोफोन आणि कॅमेरा बंद करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. या पर्यायामुळे आता आयोजक मीटिंगमधील सर्व युजर्सचे कॅमेरे आणि मायक्रोफोन बंद करू शकणार आहे.
आयओएस आणि अँड्रॉइडमध्ये अपडेट
Google चे हे फिचर Microsoft कंपनीच्या Microsoft Teams मध्ये यापूर्वीच ऑफर करण्यात आले आहे. याच धर्तीवर Google च्या Education Fundamentals आणि Education Plus च्या सर्व अॅप्समध्ये मीटिंग होस्टला अधिक अधिकार देण्यात आले आहेत. तसेच Google च्या इतर वर्कस्पेसमध्ये आगामी काळात हे फिचर अपडेट होणार आहे. युजर्सचे मायक्रोफोन आणि कॅमेरे म्यूट करण्याचे अधिकार होस्टना मिळणार आहेत. आवश्यक वाटल्यास युजर्स स्वतःला अनम्युट करू शकतील. सर्व युजर्सना म्युट करण्याचे फिचर फक्त होस्टकडेच असेल. हे फिचर डेस्कटॉप ब्राउझरवर मिळेल. परंतु आयओएस आणि अँड्रॉइड बेस्ड मोबाइल अॅफ्समध्ये लवकरच ते मिळणार आहेत.
कॅमेरा, मायक्रोफोन डिफॉल्ट म्यूट राहणार
Google Meet चे मायक्रोफोन आणि कॅमेरा फिचर डिफॉल्ट लॉक होणार आहे. ऑनलाइन मीटिंगदरम्यान होस्ट त्याला ऑन करू शकतील. Google तर्फे नुकतेच Google Meet मध्ये लाइव्ह स्पीच ट्रान्सलेशन कॅप्शन फिचर कार्यान्वित करण्यात आले आहे. ज्या युजर्सना दिसण्याची समस्या आहे तसेच ज्यांना वाचण्याची समस्या आहे अशांना हे फिचर खूपच फायदेशीर ठरणार आहे.