Google सर्च टीप्स
आजकाल आपल्याला काहीही माहिती हवी असली तरी आपण पटकन गूगलचा आधार घेतो. शाळा, महाविद्यालयातील मुलेही पटकन, ”अरे गूगल कर, कळेल तुला” असे म्हणतात. जवळच्या किराणा दुकानापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील बातम्यांपर्यंत, अगदी कोणताही विषय गुगलला वर्ज्य नाही. ज्याला ‘सहज’ म्हणून गूगल सर्च करायचंय तोही करू शकतो आणि ज्याला सखोल अभ्यास करायचाय तोही करू शकतो. सर्च केल्यावर जे समोर येते ते सारे विश्वासार्ह असते की नाही आणि फक्त गूगलवर विश्वास ठेवायचा की पुस्तके, अन्य कागदपत्रे, वाचनालय वगैरेचा आधार घ्यायचा हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. आपल्याला एखादा किरकोळ आजार झाला असेल आणि आपण त्याबाबत सर्च करायला गेलो तर अधिक माहिती मिळेलही, पण कदाचित जरुरीपेक्षा जास्त घाबरायलाही होईल. म्हणूनच सर्च नेमका हवा, विश्वासार्ह सोर्स हवा. हा सर्च नेमका कसा करायचा ते महत्वाचे आहे. म्हणूनच या काही टिप्स देत आहे.
१. तुम्ही गूगलवर मोबाइलच्या संदर्भात माहिती गोळा करत आहात का ? समजा तुम्हाला एखाद्या ब्रॅण्डचा फोन नको असेल आणि फक्त बाकीचे फोन दिसावेत असे वाटत असेल तर तसे म्हणा की. उदा. महागडा आयफोन नको असेल तर असा सर्च द्या – Latest Smartphone Launches -iphone. यात वजा (-) ही खूण महत्वाची आहे. असा सर्च दिलात की आयफोन सोडून बाकीचे फोन दिसतील आणि तुमचे काम सोपे होईल.
२. समजा तुम्हाला एखाद्या विषयावर एखाद्या वर्तमानपत्रातील लेख अथवा बातमी शोधायची आहे. अन्य ठिकाणचा मजकूर नकोय. मग तुम्ही सर्च करताना (:) याचा वापर करा. उदा. Onepluse updates :https://timesofindia.indiatimes.com असे म्हणा. म्हणजे oneplus फोनच्या अपडतेबद्दल टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेलीच बातमी तुम्हाला दिसेल. उगाच वेळ वाया जाणार नाही.
३. समजा तुम्हाला एखाद्या पुरस्काराविषयी अथवा विषयाविषयी नेमका सर्च करायचा आहे. मग ” ” या चिन्हांचा वापर करा. उदा. ”पुणे पुण्यभूषण पुरस्कार”. किंवा ”मुंबई नगररचना समिती” . म्हणजे नेमक्या याचा विषयाचा सर्च तुमच्या समोर येईल. ” ” याचा वापर न केल्यास पुणे, पुण्यभूषण, पुरस्कार, नगररचना वगैरे शब्द असलेले सगळे पर्याय समोर दिसतील. आणि नेमके शोधण्यात वेळ जाईल.
४. तुम्हाला मुंबई नगररचना या संबंधातील सर्च करायचा आहे. पण त्या नावाची समिती आहे, विभाग आहे की आणखी काही हे नक्की माहीत नाही. मग जे शब्द नाहीत त्या जागी * चा वापर करा. म्हणजे मी नुसते ”मुंबई नगररचना * ” असे म्हटले की मला काय हवे आहे ते गुगलला कळते. नेमकी माहिती तुमच्यापुढे येते.
५. समजा तुम्हाला कोणीतरी एक पार्सल पाठवले आहे. त्या पार्सलचा ट्रॅकिंग नंबरही तुम्हाला त्या व्यक्तीने दिलाय. या क्षणी ते पार्सल कुठे आहे ते कसे शोधाल? तो ट्रॅकिंग नंबर थेट गुगलला विचारा. ताबडतोब कळेल. कुरिअर कंपनीची website शोधत बसण्यात वेळ घालवू नका.
६. समजा तुम्ही मोबाइलला फोनसाठी सर्च करत आहात. एखाद्या website वर (समजा फ्लिपकार्ट) तुम्हाला मनाजोगत्या किमतीत फोन उपलब्ध नाहीत असे वाटले आणि अशाच website सारखी दुसरी website पाहावी असे वाटले. तर कसे सर्च कराल ? असे म्हणा – related:flipcart .com म्हणजे फ्लिपकार्ट सारख्याच दुसऱ्या वेबसाइट्स पटकन मिळतील. (अमेझॉन वगैरे)
७. ज्यांचा गणित हा विषय कच्चा आहे त्यांच्यासाठी ही टीप. काही मोठी बेरीज, वजाबाकी करायची असेल तर पूर्वी Calculator वापरत असू. आता मोबाइलमधील Calculator वापरतो. पण तोही हाताशी नाही असे झाले तर? तुम्ही गुगलला विचारू शकता. सर्च बारमध्ये ते आकडे type करा. समजा असे तुपे केले. ४५८९६३ +३६५९८४. गूगल ताबडतोब याची बेरीज ८२४९४७ असल्याचे सांगेल. तेही ०.३८ सेकंदात ! डोक्याला ताप नाही.
८. तुम्हाला एकाच वेळेस दोन गोष्टी शोधायच्या असल्या तर OR चा वापर करा. उदा. ”सचिन तेंडुलकर or सौरभ गांगुली” . म्हणजे या दोघांचीच माहिती मिळेल. इतरांना नो एन्ट्री.
९. गूगलची सर्वात मोठी सोया म्हणजे तुम्हाला विशिष्ट कालावधीतील सर्च हवा असेल तर तसेही शोधता येते. उदा. मला ‘महाराष्ट्र ‘ विषयावर गेल्या तासाभरात नेटवर काय अपलोड झाले आहे तेवढेच हवे आहे. मी गुगलला ‘महाराष्ट्र असा सर्च दिला. तेव्हा या शब्दाला अनुसरून अवघ्या ०.७० सेकंदांत सुमारे २७ कोटी results आले. घाबरू नका. आता पानावर Tools असे option दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर Any time आणि All results असे दोन पर्याय दिसतील. त्यापैकी Anytime यावर क्लिक करा. तिथे ‘मागील एक तासात, २४ तासात, एक आठवड्यात वगैरे पर्याय दिसतील. त्यातील एका तासात हा पर्याय निवडा. त्याबरोबर मागील एक तासात वेबवर या विषयावर आलेला मजकुराचा दिसेल. त्यातले हवे ते पटकन मिळू शकेल.
१०. समजा तुम्हाला नेटवर विशिष्ट विषयाची PDF शोधायची आहे. बाकी मजकूर नकोय. समजा मला मुंबई उपनगरांविषयीच्या pdf हव्या आहेत. तर असे म्हणा – *mumbai sububs filetype :pdf . या विषयावरील pdf तुमच्यासमोर हजर होतील. या टिप्स वापरल्यात तर तुम्ही नेमका सर्च करू शकाल आणि तुमचा वेळ वाया जाणार नाही.