मुंबई – जीमेल ही सर्वाधिक वापरली जाणारी इमेल सेवा आहे. इमेल असो व ऑनलाईन करत असलेले कोणतेही काम असो, सुरक्षितता अतिशय महत्वाची असते. तुमची सुरक्षितता भेदण्याचे प्रयत्न हॅकर्स करताच असतात. आता तुम्ही जीमेलला लॉगिन केलेत की लगेच तुमच्या फोनवर एक संदेश येईल. याला Google Prompt असे म्हणतात. किंवा एक कोड येईल. तो दिल्यावरच तुमचे जीमेल ओपन होईल.
अलीकडे पासवर्ड हॅक करण्याचे प्रकार खूप वाढले आहेत. तुम्ही पासवर्ड देताना तो कोणी बघितला, अथवा अगदी जवळच्या माणसांना तुम्ही पासवर्ड सांगितलं असेल, आणि त्यांच्याकडून चुकून लीक झाला असेल तर सगळं डेटा एका क्षणात हॅकर्सच्या ताब्यात जाऊ शकतो. मग तुम्ही हात चोळत बसण्याशिवाय काहीही करू शकत नाही. म्हणूनच जीमेल २६ ऑक्टोबरपासून २ स्टेप वेरिफिकेशन सुरु करत आहे. ते स्वीकारणे अत्यावश्यक आहे. कारण त्याशिवाय जीमेल ओपन होणारच नाही.
इतर मेल सेवाही हे २ स्टेप वेरिफिकेशन लवकरच अत्यावश्यक करतील अशी चिन्हे आहेत. यामुळे सुरुवातीला थोडा त्रास झाल्यासारखे वाटेल, परंतु हे तुमच्याच सुरक्षेसाठी आहे हे लक्षात ठेवा. बऱ्याच जीमेलधारकांना ही आजही वापरता येईल. म्हणून सांगतो, लगेच तुमच्या जीमेलच्या settings मध्ये जाऊन Security check -up वर क्लिक करा आणि Turn ON बटनावर क्लिक करा!
(ज्येष्ठ पत्रकार अशोक पानवलकर यांच्या ब्लॉगवरुन साभार)