आपण जवळपास सर्वजणच जीमेल वापरतो. पण, त्यातील अनेक सुविधा आपल्याला माहित नाहीत. त्या माहिती झाल्या तर आपली अनेक कामे सोपी होणार आहेत. हे शॉर्टकट नेमके कोणते ते आपण जाणून घेऊया… यात एक शॉर्टकट Snooze असा आहे. हे काय आहे?
तुमच्या बॉसकडून अथवा कार्यालयातील सहकाऱ्यांकडून एखादा मेल येतो. समजा तुम्ही त्या दिवशी रजेवर आहात आणि तो मेल तुम्हाला त्या वेळेस नकोय, पण मेल महत्वाचा असल्याने दुसऱ्या दिवशी किंवा नंतर कधीही तो मेल यायला हवाय? जीमेल ती सुविधा देते. जो मेल तुम्हाला नंतर हवाय तो ओपन न करता फक्त सिलेक्ट करायचा. नंतर खाली दिलेल्या चिन्हांपैकी घडाळ्याचे चिन्ह निवडा. आजच नंतरच्या वेळेस, उद्या, आठवड्याअखेरीस, पुढील आठवड्यात अथवा तुम्हाला हवा असेल त्या दिवशी आणि वेळेस असे पर्याय दिसतील. तुम्हाला हवा असलेला दिवस आणि वेळ निवडा. तो मेल तुमच्या इनबॉक्समधून तात्पुरता गायब होईल आणि तुम्हाला हव्या असलेल्या वेळेस परत इनबॉक्समध्ये येईल. असे केल्याने त्या मेलवर योग्य त्या पद्धतीने काम करता येते आणि तुमच्या दुसऱ्या कामात व्यत्ययही येत नाही.
याच शॉर्टकटमध्ये Mute Conversation असाही एक शॉर्टकट आहे. तोही विलक्षण फायद्याचा आहे. अनेकांना CC ठेवून एखादा माणूस एक मेल पाठवतो. लोक त्याला उत्तर देताना रिप्लाय ऑल करून मेल पाठवतात. इतरांना हे त्रासाचे वाटते. त्यामुळे मूळ मेलच्या नंतर पुढचे मेल नको असतील तर मूळ मेल सिलेक्ट करा. वर दिलेल्या चार्टमधील अगदी उजवीकडील तीन उभ्या बिंदूंवर क्लिक करा. मग Mute हा पर्याय स्वीकारा. या मेलचे पुढचे मेल येणे बंद होईल. आणि इनबॉक्स उगाचच भरला जाणार नाही.
हे शॉर्टकट वापरून जीमेलचा अनुभव अधिक समृद्ध होईल हे नक्की.
ज्येष्ठ पत्रकार अशोक पानवलकर यांच्या ब्लॉगवरुन साभार