इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय क्रिकेट संघ सध्या चांगलाच फार्मात आहे. कसोटी, एक दिवसीय, टी-२० अशा प्रत्येकच प्रकारात भारतीय संघाचा वरचष्मा दिसून येतो. त्यामुळे समस्त भारतीय क्रिकेटप्रेमींची छाती अभिमानाने फुलली आहे. पण, त्याच वेळी एका वृत्तसंस्थेने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून चिंता वाढविणारी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. खुद्द बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी खेळाडूंबाबत आश्चर्यचकीत करणारे खुलासे केले असल्याचा दावा केला जात आहे.
संबंधित वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार चेतन शर्मा यांचे बोलणे झुप्या कॅमेऱ्याच्याद्वारे टिपले आहे. त्यात शर्मा भारतीय क्रिकेट संघ डोपिंगच्या (उत्साहवर्धक इंजेक्शन) विळख्यात अडकल्याचे सांगिताना दिसतात. भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू स्वत:ला फीट ठेवण्यासाठी हे इंजेक्शन घेतात. ही बाब बीसीसीआयला माहीत असूनही क्रिकेट बोर्डाकडून याकडे कानाडोळा केला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
निवडकर्त्यांनाही ठेवले जाते खूश
भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी क्रिकेटर्स कशा पद्धतीने निवड समितीला खूश ठेवतात, याबाबरही चेतन शर्मा यांनी प्रकाश टाकला आहे. शिवाय विराट कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्यातील वादावरही चेतन शर्मा यांनी भाष्य केले आहे. सौरभ गांगुली यांच्यामुळेच विराट कोहलीला कर्णधारपद सोडावे लागले असल्याचा गौप्यस्फोटही चेतन शर्मा यांनी केला आहे.
क्रिकेटप्रेमींची निराशा
भारतात क्रिकेटला सर्वाधिक लोकप्रियता लाभली आहे. क्रीडा क्षेत्रासाठी डोपिंग ही काही नवीन बाब राहिली नाही. अनेक स्पर्धक डोपिंग चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. काही प्रकरणांमध्ये तर औषधी सेवन करणाऱ्या खेळाडूंची डोपिंग टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांची गाजलेली कारकिर्दही डागाळली. आजवर क्रिकेट क्षेत्र त्यापासून लांब असल्याचे वाटत होते. पण, क्रिकेटलाही किडीची लागन झाल्याची बाब क्रिकेटप्रेमींसाठी निराशाजनक ठरली आहे. आता क्रिकेटप्रेमी या प्रकरणावरून संताप व्यक्त करू लागले आहेत.
Team India Players Sting Operation Shocking Info