मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेचे संघात पुनरागमन झाले आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर त्याला वगळण्यात आले होते. ७ ते ११ जून दरम्यान होणाऱ्या या अंतिम सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. हा सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर होणार आहे.
अजिंक्य रहाणे भारताकडून शेवटची कसोटी ११ जानेवारी २०२२ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. त्या सामन्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. त्याने भारतासाठी ८२ कसोटी सामन्यांमध्ये ३८.५२ च्या सरासरीने ४९३२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १२ शतके आणि २५ अर्धशतके झळकली आहेत. भारताचे अनेक सामन्यांमध्ये कर्णधार राहिलेल्या रहाणेचे १ महिन्यांनंतर टीम इंडियात पुनरागमन झाले आहे.
रहाणेने शेवटच्या कसोटी डावात केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. याच कारणामुळे त्याला संघातून वगळण्यात आले. रहाणेने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जसाठी त्याने पाच डावात ५२.२५ च्या सरासरीने २०९ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १९९.०४ आहे. याचा फायदा रहाणेला मिळाला आणि त्याची संघात निवड झाली. श्रेयस अय्यरची अनुपस्थिती आणि सूर्यकुमार यादवच्या खराब कसोटीतील कामगिरीचाही त्याला फायदा झाला.
भारताचा कसोटी संघ असा
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
? NEWS ?#TeamIndia squad for ICC World Test Championship 2023 Final announced.
Details ? #WTC23 https://t.co/sz7F5ByfiU pic.twitter.com/KIcH530rOL
— BCCI (@BCCI) April 25, 2023
गेल्या वेळी काय झाले होते
भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध जेतेपदाच्या लढतीत त्याला अखेरचा पराभव स्वीकारावा लागला होता. टेस्ट चॅम्पियनशिपच्या २०२१-२३ हंगामात टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली. गुणतालिकेत टीम इंडिया ऑस्ट्रेलिया नंतर दुसऱ्या स्थानावर आहे.
Team India Declared for World Test Championship