औरंगाबाद ( इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – जिल्हा परिषद औरंगाबाद अंतर्गत कार्यरत शिक्षक कर्मचारी यांना अमृत महोत्सव वर्षा पासून यापुढे जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या जमाखर्च व व्याज आकारणीचा लेखाजोखा पाहायला मिळणार असल्याची माहिती मुख्य लेख व वित्त अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाला दिली.
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात भेटीस आलेल्या शिष्टमंडळाला संबोधित करताना ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भविष्य निर्वाह निधी मधून मिळणाऱ्या कर्जासाठी लागणारा प्रतीक्षा कालावधी थेट १५ दिवसांनी कमी होईल कारण यासंदर्भात लागणारा डाटा शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ माहितीवरून आपोआप घेतला जाईल.वैद्यकीय देयकांचा दुसरा टप्पा निधी प्राप्त होताच निकाली काढू,यापुढील काळात दरमहा एक तारखेलाच शिक्षकांचे वेतन होणार आहे असे आश्वासन त्यांनी दिले. कोरोना काळात निधन झालेल्या शिक्षकांबद्दल प्रशासन नेहमीच संवेदनशील राहिल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.अंशदायी पेन्शन योजनेत सहभागी ३२४३ शिक्षकांनी आतापर्यंत प्रान (नोंदणी) नंबर यशस्वीरीत्या प्राप्त केला आहे,इतरांनीही तातडीने कार्यवाही करावी म्हणजे घवघवीत व्याज त्यांना मिळू शकेल असे आवाहन त्यांनी केले. शिष्टमंडळात शिक्षक भारतीचे नेते प्रकाश दाणे,सुनील चिपाटे,राजेश भुसारी,महेंद्र बारवाल, मच्छिंद्र भराडे,संजय बुचुडे,रमेश जाधव, प्रशांत नरवाडे, प्रवीण संसारे,साहेबराव धनराज, आदींचा सहभाग होता.