नाशिक – जिल्ह्यातील केंद्र प्रमुख व प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला जात असला तरी त्याचे काहीच होत नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. अखेर याची दखल कृषीमंत्री दादा भुसे यांनी घेतली आहे. यासंदर्भात भुसे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक उद्या (सोमवार, २ ऑगस्ट) नाशिक जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये होणार आहे. दुपारी ४ वाजता होणाऱ्या या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, केंद्र प्रमुखांच्या संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत. या मागण्यांची सद्यस्थिती काय आहे आणि कुठल्या अडचणी आहेत याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीमुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.