मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील शेकडो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू आहे. अनुदानाच्या मागणीसाठी गेली २० ते २२ वर्षे आंदोलन करणाऱ्या शिक्षकांनी आता १०० टक्के अनुदान मिळाल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्धार केला आहे. ऐन दिवाळीच्या सणातही शेकडो शिक्षक आंदोलन करीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू असले तरी त्याची कुठलीही दखल राज्य सरकारने न घेतल्याने आंदोलकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
विनाअनुदानित शाळांमधील ८० ते ९० हजार शिक्षक अनुदानाच्या मागणीसाठी मागील कित्येक वर्षे आंदोलन करीत आहेत. मात्र या शिक्षकांना सेवा संरक्षण आणि अनुदान देण्याचा निर्णय आतापर्यंत झालेला नाही. आता या शिक्षकांनी ‘करो या मरो’ची लढाई सुरू केली असून अनुदान घेतल्याशिवाय आंदोलन स्थगित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील अंशतः अनुदानित २० आणि ४० टक्के अनुदान घेणाऱया, त्रुटी पूर्तता केलेल्या तसेच अघोषित असणाऱया सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना ‘सरसकट’ हा शब्द काढून पूर्वीच्या प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, अशी मागणी राज्य विनाअनुदानित व अनुदानित शाळा कृती समितीने केली आहे. राज्यातील विनाअनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतरांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून वेळोवेळी दिरंगाई होत असल्याचा आरोप कृती समितीचे मुंबई विभागीय अध्यक्ष संजय डावरे यांनी केला आहे.
राज्यात विनाअनुदानित शिक्षकांची परवड सुरूच आहे. अनुदान जाहीर करूनही ते वेळेत दिले जात नाही. त्यामुळे असंख्य विनाअनुदानित शिक्षकांनी या वेठबिगारीला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली आहे, तर हजारो शिक्षक बिनपगारी सेवानिवृत्त होत आहेत. आता सरकारने २० टक्के सरसकट अनुदान देण्याचा सप्टेंबर २०१६चा शासन निर्णय रद्द करून नोव्हेंबर २०११ आणि जून २०१४ च्या शासन निर्णयातील नैसर्गिक टप्पावाढ अनुदान सूत्रानुसार वेतन द्यावे या मागणीच्या पूर्ततेसाठी आझाद मैदानात ठाण मांडून बसण्याचा निर्धार शिक्षकांनी केला आहे.
Teachers Agitation in Mumbai Azad Maidan Diwali Festival