इंडिया दर्पण वृत्तसेवा – विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी शाळेत नियम बनवले जातात. विद्यार्थ्यांसाठी नियम असणे चांगली गोष्ट आहे. पुढील आयुष्यात त्यांच्यासाठी ते कामाला येतात. विशेषतः बोर्डिंग शाळेत विद्यार्थ्यांसाठी कठोर नियम असतात. विद्यार्थ्यांना शाळेत मोबाईल नेण्यास परवानगी नसते. परंतु तरीही काही विद्यार्थी शाळेत लपवून मोबाईल नेतात. काही शाळांमध्ये स्मार्टफोन जप्त केले जातात. तिथे विद्यार्थ्यांना शिक्षाही केली जाते. विद्यार्थ्यांच्या पालकांना याबाबत माहिती दिली जाते. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. तो व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ इंडोनेशियामधील एका शाळेतील आहे. यामध्ये एक शिक्षिका मोबाईल आगीच्या ड्रममध्ये फेकताना दिसत आहेत. ड्रमच्या आजूबाजूला विद्यार्थी उभे आहेत. त्यांच्यासमोरच शिक्षिकेने सर्व मोबाईल जाळले. एक शिक्षिका मोबाईल आगीत टाकत असताना, तसेच दुसऱ्या शिक्षिका समोर येऊन ड्रममध्ये मोबाईल टाकत असताना दिसत आहे.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर झाला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या शिक्षिकेला युजर्सनी फ्लेम थ्रोअर असे नाव दिले आहे. आगीत अनेक स्मार्टफोन फेकले आहेत, असे बोलले जात आहे. इतके महाग मोबाईल शिक्षकांनी आगीच्या हवाली केले. हा व्हिडिओ चार लाख वेळा पाहण्यात आला आहे. त्यावर युजर्स विविध प्रतिक्रिया देत आहेत. अनेक युजर्सनी शिक्षकांना पाठिंबा दिला आहे. शाळेत मोबाईल नेण्याची परवानगी नसताना, पालकांनी विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल कसे दिले, असा सवाल युजर्स विचारत आहेत. काही युजर्सनी शिक्षकांची कृती चुकीची असल्याचे म्हटले आहे. हे मोबाईल विद्यार्थ्यांकडून घेऊन पालकांकडे सुपूर्द करायला हवे होते, असे युजर्सनी म्हटले आहे.