नवी दिल्ली – आसाममध्ये फिलोबारीतील काही विद्यार्थी फी वाढीविरोधात आंदोलन करत होते. तेव्हा त्यांनी एका शिक्षिकेला भर रस्त्याच्या मध्यभागी थेट लोटांगण घालून माफी मागण्यास भाग पाडले. आता व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आसाम सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
ऑल आसाम स्टुडंट्स युनियनच्या विद्यार्थी संघटनेने फी वाढी विरोधात आंदोलन सुरू केले होते. फिलोबरी वरिष्ठ माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान रास्ता रोकोही केला होता. तेव्हा शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मन वळवून आंदोलन मागे घेऊन रस्ता खुला करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये तणाव निर्माण झाला. दरम्यान, विद्यार्थ्यांनी एका शिक्षकाला घेरले आणि नंतर तिला लोटांगण घालून माफी मागण्यास भाग पाडले.
या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शिक्षिका लोटांगण घालून हात जोडताना दिसत आहेत. या प्रकरणात ऑल आसाम स्टुडंट्स युनियनच्या एका ज्येष्ठ नेत्याला संघटनेने हद्दपार केले आहे. कारण त्याने आंदोलक विद्यार्थ्यांना भडकवल्याचा आरोप आहे. तसेच डूमडोना महसूल मंडळाच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर तीन दिवसांत तपास अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
आसाम सरकारने या प्रकरणी कडक भूमिका घेतली असून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, तर या घटनेचा निषेध करताना आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा बोबिता शर्मा म्हणाल्या की, जगभरात शिक्षकांचा आदर केला जातो. गेल्या २७ वर्षांपासून शाळेत सेवा करणाऱ्या शिक्षकाला गुडघे टेकून माफी मागावी लागली, ही घटनाच दुदैवी आहे.