जयपूर – पूर्वीच्या काळी म्हणजे साधारणत : चाळीस पन्नास वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मारणे एक सर्वसामान्य गोष्ट मानली जात असे. अगदी काही शिक्षक विद्यार्थ्यांना चांगले फोडून काढत असत. परंतु अशा असे मारकुटे गुरुजींबद्दल पालक, विद्यार्थी किंवा अन्य कोणाची काही फारशी तक्रार नसे. परंतु अलीकडच्या काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही कारणाने मारू नये. असा केवळ महाराष्ट्रातील शिक्षण विभागाचाच नव्हे तर देशभरातील अन्य राज्यांचाही शिक्षण खात्याचा आदेश आहे. तरी काही शिक्षक रागाच्या भरात विद्यार्थ्यांना मारतात. परंतु त्यातून एखादेवेळी दुर्दैवी घटना देखील घडू शकते. राजस्थानमध्ये देखील असेच घडले. एका शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ केला नाही म्हणून मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
चुरू जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव गणेश (वय 13) असे आहे. तो एका खासगी शाळेत इयत्ता सातवी मध्ये शिकत होता. गृहपाठ पूर्ण न केल्याने शिक्षक मनोज (वय 35) या शिक्षकाने रागाच्या भरात गणेशला बेदम मारहाण केली. त्यामुळे गणेश बेशुद्ध झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी शिक्षक मनोज विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेबद्दल दु: ख व्यक्त करत शिक्षणमंत्री गोविंद डोटासारा यांनी शाळेची मान्यता स्थगित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या प्रकरणाची पूर्ण चौकशी होईपर्यंत शाळेचे वर्ग तात्पुरते बंद करण्याचेही निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.