विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
गेल्या दीड वर्षात देशभरात कोरोना या संसर्गजन्य आजारांचा सर्वांनी धसका घेतला आहे. आता काही राज्यांमध्ये कोरोनाची साथ आटोक्यात आली आहे, मात्र तरीही कोणताही आजार झाला तर कोरोनाची शंका उपस्थित केली जात आहे. परंतु कोरोना आटोक्यात येत असतानाच कोरोनामधून बरे झालेले रुग्ण खोकला, ताप तसेच घशातून किंवा नाकामध्ये रक्त येणे आणि थकवा आल्याची तक्रार करतात, तेव्हा ही लक्षणे टीबीची देखील असू शकतात, असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
कानपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या ओपीडी आणि पोस्ट कोविड क्लिनिकमध्ये अनेक रुग्णांमध्ये टीबीचा आजार झाल्याचे आढळले आहे. तसेच या वैद्यकीय महाविद्यालयाच्या आरोग्य व मानसोपचार विभागाच्या अहवालात असे म्हटले आहे की, संक्रमणाव्यतिरिक्त, अति ताणामुळे रोग प्रतिकारशक्ती देखील कमी झाली आणि टीबीने रूग्णांचा ताबा घेतला आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.अरविंद यांनी सांगितले की, यापुर्वी मेडिसिन ओपीडीमध्ये एकाच वेळी इतके टीबी रुग्ण कधी आढळले नाहीत. आता मात्र खोकला, ताप आणि थकवा असलेल्या प्रत्येक रुग्णाला टीबी चाचणी घेण्यास सांगितले जात आहे. कारण अचानक ओपीडीमध्ये टीबीचे रुग्ण वाढले. त्यापैकी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
कोरोना संसर्गादरम्यान, अनेक रुग्णांचे फुफ्फुस पाण्याने भरले होते. त्यात एक पोकळी निर्माण झाली आणि श्लेष्मात रक्त येऊ लागले. या चाचणीने टीबीची शंका व्यक्त केली. रुग्णांची खबरदारी म्हणून टीबी तपासणी सुरू करण्यात आली आहे. जेणेकरून ती माहिती योग्य वेळी मिळू शकेल. काही रुग्णांना तपासणीनंतरही दाखल केले जात आहे. तर काहींवर घरून उपचार केले जात आहेत. श्वसन तज्ञ डॉ.वीरोत्तम तोमर म्हणतात की, कोविडनंतरच्या टप्प्यातील अनेक रुग्णांमध्ये फुफ्फुसात पाणी, पोकळी आणि गाठी आढळल्या. चाचणीत अनेकांना टीबी आढळला. त्याचवेळी, न्यूरोसाइकियाट्रिस्ट डॉ तरुणपाल यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात रुग्ण अत्यंत तणावाच्या वातावरणात गेले, तेव्हा असे हार्मोन्स सोडले जातात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वेगाने खाली येते आणि लवकरच टीबी होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्यावी.