नवी दिल्ली – संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लोकांशी संबंधित प्रश्न केंद्र सरकारसमोर मांडले जातात आणि ती सोडविण्यासाठी केंद्राकडून पावले उचलली जातात. मात्र विविध कारणांमुळे विरोधी पक्षांनी गोंधळ घातल्याने संसदेचे पावसाळी अधिवेशन वाया जाण्याच्या स्थितीत आहे. पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून पेगॅसस हेरगिरी प्रकरण आणि इतर मुद्द्यांवर विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे संसदेच्या निर्धारित १०७ तासांपैकी फक्त १८ तास काम होऊ शकले आहे. याच कारणामुळे करदात्यांचे १३३ कोटी रुपयांवर पैसे पाण्यात गेले आहेत.
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, १९ जुलैपासून सुरू झालेल्या आणि १३ ऑगस्टला समाप्त होणार्या अधिवेशनात आतापर्यंत ८९ तास वाया गेले आहेत. राज्यसभेत निर्धारित वेळेच्या जवळपास २१ टक्के काम झाले. तसेच लोकसभेत निर्धारित वेळेच्या १३ टक्क्यांहून कमी वेळ काम झाले आहे. लोकसभेतील कामकाज ५४ पैकी फक्त सात तासच होऊ शकले. तर राज्यसभेत संभाव्य ५३ तासांपैकी ११ तासच कामकाज होऊ शकले. आतापर्यंत संसदेत संभाव्य १०७ तासांमध्ये फक्त १८ तास (१६.८ टक्के) कामकाज होऊ शकले.
बहुतांश विधेयके प्रलंबित
संसदेच्या दोन्ही सभागृहात पेगॅसस हेरगिरी प्रकरण, कृषी कायदे आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी कामकाज बाधित केले. गोंधळामुळे लोकसभेत विनियोग विधेयकाव्यतिरिक्त फक्त पाच विधेयके मंजूर झाले आहेत. राज्यसभेतही जवळपास इतकेच विधेयके मंजूर होऊ शकले आहेत.