इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) गोवामाईल्स आणि एचडीएफसी पेन्शन फंड (PoP) यांच्या भागीदारीत गोव्यातल्या चालक समुदायासाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) सुरू केली आहे. गोव्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांच्या उपस्थितीत 30 सप्टेंबर 2025 रोजी पणजी इथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
या उपक्रमामुळे गोवामाईल्स प्लॅटफॉर्मवर कार्यरत असलेल्या सुमारे 5000 चालकांना सुनियोजित निवृत्ती नियोजनाचा लाभ मिळणार आहे. कार्यक्रमादरम्यान, योजनेच्या शुभारंभाचे प्रतीक म्हणून 50 चालकांना स्थायी सेवानिवृत्ती खाते क्रमांक वितरित करण्यात आले. गोवामाईल्स आपल्या सर्व चालकांच्या एनपीएस खात्यात योगदान देणार आहे.
या योजनेचा शुभारंभ करताना गोव्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण आणि गोवामाईल्सच्या प्रयत्नांचे कौतुक केले. गोव्याचे चालक केवळ सेवा पुरवत नाहीत, तर ते प्रत्येक पर्यटकासमोर गोव्याचे आदरातिथ्य, संस्कृती आणि मूल्ये सादर करणारे राज्याचे ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ आहेत, असे ते म्हणाले. गोवा हे भारतातले सर्वात लहान राज्य असले तरी, आम्ही नेहमीच इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे आणि हा उपक्रम आमच्या सर्वसमावेशक विकासाच्या वचनबद्धतेचा आणखी एक पुरावा आहे. हे ‘विकसित भारत 2047’ च्या संकल्पनेशी पूर्णपणे सुसंगत आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. रमण यांनी सुरक्षित निवृत्तीसाठी लवकर सुरुवात करणे आणि आर्थिक शिस्त पाळण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
“प्रत्येक व्यवसायासाठी, एक पेन्शन” हे पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि “एनपीएस जरुरी है” हा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.