नवी दिल्ली – अत्तर व्यापारी पीयूष जैन याच्या ठिकाणांवर वस्तू आणि सेवाकर गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) पथकाने छापा मारून कोट्यवधींची माया हस्तगत केली. जैन यांच्यासदर्भात आता दररोज नवीन खुलासे होत आहेत. घरात इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड असतानाही प्राप्तीकर विभागाच्या नजरेत येऊ नये यासाठी तो वेगवेगळ्या क्लृप्त्या करत असल्याचे उघड झाले आहे.
घरात १९४ कोटी रुपये रोख ठेवणारा पीयूष जैन फक्त १५ लाख रुपये प्राप्तीकर भरत होता. पत्नीच्या नावाने तो ८ लाख रुपये प्राप्तीकर भरत होता. ओडोकॅम इंडस्ट्रिज या त्याच्या कंपनीची उलाढाल फक्त सात कोटी निघाली आहे. पीयूष फक्त साधेपणा दाखवण्याचा दिखावा करत करत होता. प्राप्तीकर विभागाच्या नजरेत येऊ नये यासाठी तो एका सरकारी बँक अधिकाऱ्याइतकी मिळकत दाखवत होता. जैन याच्या आनंदपुरी येथील घरात ५००, २००० आणि १०० रुपयांचे नोटांचे बंडल सापडले आहेत. एक हजारांहून अधिक शंभरच्या नव्या नोटांचे बंडल आहेत. कन्नोज येथील त्याच्या वडिलोपार्जित घरात मिळालेल्या १७ कोटी रुपयांमध्ये दहाच्या गड्ड्या मोठ्या प्रमाणात आहेत.
वडील परदेशातून परतले
पीयूष जैन याचे वडील महेश चंद जैन अनेक दिवसांपासून परदेशात रहात होते. २०१५ रोजी ते भारतात परतले होते. ते त्यांच्या कन्नौज येथील घरात रहात होते. तेसुद्धा फक्त १४ लाख रुपये प्राप्तीकर भरत होते. कन्नौज येथील घर वडिलांच्या नावावर, तर कानपूर येथील घर कल्पना जैन यांच्या नावावर आहे. कन्नौज येथील गोदामत ४५ प्रकारचा कच्चा माल आहे. त्यापैकी कोणत्याही मालाची पावती किंवा कागदपत्रे नाहीत. त्यामुळे संपूर्ण तपशील तयार करण्यासाठी तपास पथकाला खूप वेळ लागला.