नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -प्राप्तिकर कायदयानुसार उत्पन्नाचे साधन/स्रोत असणाऱ्या तसेच विविध माध्यमातून उत्पन्न प्राप्त होत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करावे लागत असते. प्राप्तिकर कायदयानुसार निर्धारित वेळेतच रिटर्न दाखल केले पाहिजे. नोकरदार व वैयक्तिक करदात्यांना आर्थिक वर्ष २०२३-२४ चे प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची ३१ जुलै शेवटची तारीख होती या तारखेनंतर रिटर्न दाखल केल्यास लेट फी तसेच दंड हि लागेल.
प्राप्तिकर कायद्याच्या नियमांनुसार ज्या व्यवसाय, उद्योग-धंद्याचे लेखापरिक्षण करून, टॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करणे अनिवार्य आहे त्याकरिता रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे. ज्या उद्योग-धंद्याची वार्षिक उलाढाल १ कोटी रुपयांपेक्षा जास्त त्यांना प्राप्तिकर कायद्याच्या कलम ४४ एबी नुसार लेखापरीक्षण करून घेणे अनिर्वार्य आहे. उद्योग धंद्याच्या व्यतिरिक्त वकील, डॉक्टर, इंजिनियर, वास्तुविशारद इ. व्यावसायिक यांची वार्षिक उलाढाल ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास अशा करदात्यांनी लेखापरीक्षण करून घेतले पाहिजे. तसेच ज्या करदात्यांच्या उद्योग-धंदाची वार्षिक उलाढाल रु.२ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे मात्र त्यांचा निव्वळ नफा हा एकूण उलाढालीच्या ८ टक्क्यांपेक्षा कमी असेल त्यांना सुद्धा टॅक्स ऑडिट च्या तरतुदी लागू होत असतात.
प्राप्तिकर विभागाकडून मागील काही वर्षांपासून करदात्यांना प्राप्तिकरात सुलभता यावी यासाठी “अनुमानित कर तरतुदींच्या” आधारावर करदात्यांना विवरणपत्रके दाखल करण्यासाठी प्राप्तिकर कायद्यातील कलम ४४ एडी, ४४ एडीए नुसार सुविधा देण्यात आली आहे. हि सुविधा निवडक व्यवसाय उद्योग-धंद्यातून मिळणाऱ्या उत्पन्ना करिताच आहे.
रिटर्न फाइलिंग प्रक्रिया वेळेत पूर्ण करा..
लेखापरीक्षण व ऑडिट रिपोर्ट वेळेत दाखल न केल्यास करदात्यांना आयकर कायद्याच्या कलम २७१ बी अंतर्गत एकूण उलाढालीच्या ०.५% पर्यंत दंड लागू शकतो, जो जास्तीत जास्त रु. दीड लाखापर्यंत असू शकतो. तसेच आयकराचे विवरणपत्रक विलंबाने दाखल केले तर कलम २३४ ए नुसार विलंब व्याज देखील लागू शकते. सध्या आयकर कायद्यामध्ये आमूलाग्र बदल झालेले असून ऑनलाईन प्रणालीमार्फतच टॅक्स ऑडिट रिपोर्ट तसेच विवरणपत्र दाखल करावी लागत असतात. व्यापारी वर्गाने याचे गांभीर्य ओळखून आपल्या व्यवसाय,धंद्याचे जमाखर्च तसेच अनुषंगिक कागदपत्रे मुदतीचे आत आपल्या करसल्लागारांना सादर केले पाहिजेत तरच ते देखील आपले कामकाज मुदतीत पूर्ण करतील. आता केवळ १० दिवस शिल्लक असल्याने टॅक्स-ऑडिट आणि रिटर्न फाइलिंग प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी व्यापारी वर्गाने तातडीने काम करणे आवश्यक आहे.
“नितीन डोंगरे – अध्यक्ष, नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन”*
अप्रिय कारवाई टाळा…
विविध व्यावसायिक- उद्योगधंदा करणाऱ्या करदात्यांनी आयकर कायदयाचे पालन करणे बंधनकारक आहे. करदात्यांनी आपले हिशेबपत्रके, लेखाजोखा वेळोवेळी अद्यावत करून ठेवणे त्यांच्या हिताचे आहे. कलम ४४ एबी नुसार ज्या व्यापारी, व्यावसायिक करदात्यांनी अद्याप लेखापरीक्षण पूर्ण करवून घेतलेले नाही अशा करदात्यांनी त्वरित ते पूर्ण करून घेऊन लेखापरीक्षण अहवाल ३सीबी/३ सीडी सह ऑनलाईन पद्धतीने मुदतीचे आत दाखल करावा. व्यवसाय उद्योग-धंदा करणारे व्यापारी तसेच व्यावसायिक यांनी विवरणपत्र आणि लेखापरीक्षण अहवाल वेळेत दाखल केल्याने आयकर विभागाकडून मुदतीनंतर आकारले जाणारे अतिरिक्त व्याज, दंड आणि नोटिसा यासारख्या अप्रिय कारवाई टाळू शकतात.
योगेश कातकाडे (कर सल्लागार, नवीन नाशिक)