नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयकर कायद्यांतर्गत विविध प्रकारचे ऑडिट करावे लागत असते. व्यवसाय- व्यापार करणाऱ्या काही करदात्यांना ‘टॅक्स ऑडिट’ करून घेणे अनिवार्य आहे. आपल्या लेख्यांचे लेखापरीक्षण करणे आणि त्याचा अहवाल ठराविक वेळेत सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे उत्पन्नाचा परतावा भरण्यासाठी उत्पन्न मोजणीची प्रक्रिया सुलभ होते. ३० सप्टेंबपर्यंत लेखापरीक्षण अहवाल आणि विवरणपत्र भरण्याची मुदत असून संबंधित करदात्यांनी कर लेखापरीक्षण करून घेणे आवश्यक आहे. मुदतीनंतर कोणी लेखापरीक्षण अहवाल व विवरणपत्र सादर केल्यास त्यांना दंड भरावा लागू शकतो.
लेखापरीक्षणा बाबतच्या आयकर कायद्यातील कलम ४४ एबी व ४४ एडी मधील महत्वाच्या तरतुदी
१. उद्योग-धंदाची वार्षिक उलाढाल १ कोटी रुपयांपेक्षा जास्त असणारे करदाते
प्राप्तिकर कायदा कलम ४४ ए बी नुसार ज्या करदात्यांच्या उत्पन्नामध्ये व्यापार-धंदा यापासूनच्या उत्पन्नाचा समावेश असेल आणि त्याच्या धंद्याची उलाढाल किंवा एकूण जमा १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे अशांना त्यांच्या लेख्यांचे लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक आहे. या उलाढालीमध्ये करदात्याने गोळा केलेल्या अप्रत्यक्ष कराचा समावेश होत नाही.
२. व्यवसायाची वार्षिक उलाढाल ५० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे असे करदाते
व्यवसायाची स्पष्ट व्याख्या नसली तरीही डॉक्टर, इंजिनीअर, सीए, वकील, वास्तू-विशारद वगैरे. असा व्यवसाय करणाऱ्या करदात्याची वार्षिक उलाढाल किंवा एकूण जमा ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास त्यांना त्यांच्या लेख्यांचे लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक आहे.
३. ज्या करदात्यांच्या उद्योग-धंदाची वार्षिक उलाढाल २ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्याचा निव्वळ नफा हा उलाढालीच्या ८ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
मागील काही वर्षांपासून करदात्यांना प्राप्तिकरात सुलभता यावी यासाठी अनुमानित कराच्या तरतुदींची व्याप्ती वाढविण्यात आली. कलम ४४ ए डी नुसार मिळणाऱ्या अनुमानित कराची सुविधा निवडक व्यापार-धंद्यातून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी आहे. ४४ ए बी कलमाची मर्यादा रु १ कोटी आणि ४४ ए डी कलमाची मर्यादा रु २ कोटी इतकी करण्यात आली आहे. ज्या करदात्यांच्या उलाढाल २ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे अशांना कलम ४४ ए डी नुसार अनुमानित कर भरण्याचा पर्याय आहे. याचे दोन फायदे आहेत एक तर त्यांना लेखे ठेवणे बंधनकारक नाही आणि लेख्याचे लेखापरीक्षण करून घेणेसुद्धा बंधनकारक नाही. परंतु अशा करदात्यांना निव्वळ नफा, उलाढालीच्या किमान आठ टक्के असणे गरजेचे आहे. हा नफा आठ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास अशा करदात्यांना त्यांच्या लेख्याचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे.
४. ज्या करदात्याच्या ठराविक व्यवसायाची उलाढाल ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यांच्या व्यवसायाचा निव्वळ नफा वार्षिक उलाढालीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे.
१ एप्रिल, २०१६ पासून ४४ ए डी ए हे कलम सुरू करण्यात आले. या कलमानुसार ज्या ठरावीक व्यावसायिकाची उलाढाल किंवा एकूण प्राप्ती ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशांचे उत्पन्न (नफा) उलाढालीच्या ५०% पेक्षा कमी दाखविल्यास त्यांना लेखे ठेवणे बंधनकारक आहे.
नितीन डोंगरे (जेष्ठ कर सल्लागार)
आयकर कायदा १९६१ मधील कलम ४४ एडी व ४४ एबी यानुसार ज्या व्यापारी, अथवा व्यावसायिकांना आपले आयकराचे विवरणपत्रक दाखल करणे अनिर्वार्य आहे, अशा व्यापारी व्यावसायिकांसाठी विवरणपत्रक दाखल करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर ही आहे. आपले आयकराचे लेखापरीक्षण करताना नवीन तरतुदीनुसार,कायद्यातील सर्व बारीकसारीक बदल, काही नियमांचा आधार घ्यावा लागत असतो त्यातील तरतुदी समजावुन घेणे, त्यानुसार कायद्याच्या चौकटीत राहून व्यवहार करणे गरजेचे आहे. आयकर कायद्यातील कलम ४४ एबी व ४४ एडी याबाबतचे नियम हे व्यापाऱ्यांच्या उलाढालीनुसार लागू होत असतात. या कायद्याअंतर्गत आयकराचे लेखापरीक्षण हे कोणत्या व्यापारी, व्यवसायिकांना लागू होते अथवा लागू होत नाही हे देखील निश्चित केले पाहिजे.
योगेश कातकाडे (कर सल्लागार)
प्रत्येक व्यावसायिक-व्यापारी यांना आयकर कायदयाचे पालन करणे बंधनकारक आहे. करदात्यांनी व्यवसायाचा लेखाजोखा अद्ययावत ठेवला पाहिजे. ज्या करदात्यांना कलम ४४ ए बी नुसार लेखापरीक्षण बंधनकारक असून ३० सप्टेंबरच्या आत लेखापरीक्षण अहवाल आणि विवरणपत्र दाखल करावयाचे आहे. अजून वेळ गेलेली नाही. व्यावसायिक – व्यापारी यांनी विवरणपत्र आणि लेखापरीक्षण अहवाल वेळेवर दाखल केल्याने अतिरिक्त व्याज आणि दंड यासारख्या यासारख्या खर्चिक बाबीं टाळता येतील.
Tax Audit Income Tax Return Deadline Consultant