विशेष प्रतिनिधी, मुंबई
भारतात इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सने गेल्यावर्षी बाजी मारली आहे. टाटाची सर्वांत सुरक्षित कार नेक्सॉनचे इलेक्ट्रीक मॉडेल भारतातील सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल ठरल्यामुळेच हा दावा करता येत आहे. अलीकडेच कंपनीनी घोषणा केली की गेल्यावर्षी टाटा नेक्सॉनच्या २ हजार ६०० पेक्षा अधिक गाड्यांची विक्री झाली आहे.
या कारचे लॉन्चिंग गेल्यावर्षी २८ जानेवारीला झाले होते. मात्र लॉकडाऊन लागल्यामुळे मेपर्यंत विक्री थांबविण्यात आली होती. तरीही मेमध्ये ७८ गाड्यांची विक्री झालीच. टाटा नेक्सॉन इलेक्ट्रीक गाडीची किंमत १३.९९ लाख रुपयांपासून ते १५.९९ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. Xm, XZ+ आणि XZ + Lux या तीन व्हेरियंटमध्ये ही गाडी उपलब्ध आहे.
टाटा नेक्सॉन इव्ही ही गाडी सध्याच्या मॉडेलप्रमाणेच ५ सीटर लेआऊटमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये ३०.२ लिथियम आयर्न बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. तसेच आठ वर्षांची वॉरंटीही देण्यात आली आहे. सिंगल चार्जिंगमध्ये ३१२ किलोमीटरपर्यंत रेंज देण्याची क्षमता नेक्सॉनमध्ये असल्याचा कंपनीचा दावा आहे.
फूल चार्जिंगसाठी आठ तासांचा कालावधी लागतो. नेक्सॉनमध्ये ७ इंचाचा टीएफटी डिस्प्ले, आटो एसी, आटो हेडलँप, सनरुफ, ७.० इंचाचा टचस्क्रीन, इंफोटेनमेंट सिस्टीम अशा सुविधा आहेत. नेक्सॉन इलेक्ट्रिकची ड्रायव्हींग रेंज या गाड्यांच्या इतर सेगमेंटच्या तुलनेत जास्त आहे, हे महत्त्वाचे.