पुणे – देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता असलेल्या टाटा मोटर्सने आपली नवीन इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट सेडान कार ‘टिगोर ईव्ही’चे बुकींग सुरू केले आहे. ही नवीन इलेक्ट्रिक कार कंपनीच्या झिपट्रॉन तंत्रज्ञानावर आधारित आहे. ग्राहकांना अवघ्या २१ हजार रुपयांमध्ये ही कार बुक करता येत आहे. अधिकृत वेबसाइट तसेच डीलरशिपद्वारे बुकिंग सुरु झाले आहे.
आतापर्यंत टिगोर कार इलेक्ट्रिक सरकारी कार्यालये आणि फ्लीट ऑपरेटरसाठी उपलब्ध होती, परंतु आता ही कार खासगी ग्राहकांसाठीही सादर करण्यात आली आहे. सध्या, कंपनीने ही कार प्रदर्शित केली असून ३१ ऑगस्ट रोजी विक्रीसाठी सर्वत्र लाँच केली जाईल. नवीन इलेक्ट्रिक कार टिगोरच्या पेट्रोल फेसलिफ्ट मॉडेलवर आधारित असून कंपनीने गेल्या वर्षीच ती सादर केली होती. विशेष म्हणजे ही कार पेट्रोल मॉडेलसारखीच आहे.
संपूर्ण सेटअप हायलाइट करणारे इलेक्ट्रिक ब्लू अॅक्सेंट समाविष्ट असून टिगोर ईव्हीला हेडलॅम्पच्या खाली आणि 15-इंच अलॉय व्हील्सवर ब्लू हायलाइट्स देखील मिळतात. या कारची केबिन देखील सध्याच्या टिगोरसारखीच आहे, कारच्या आतही निळ्या अॅक्सेंटचा चांगला वापर केला गेला आहे. या कारच्या वैशिष्ट्यांमध्ये अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह 7.0 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 4 स्पीकर्स आणि 4 ट्विटर, इरा कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांचा समावेश आहे.
पॉवरट्रेन आणि चार्जिंग
नवीन टिगोर ईव्ही साठी सर्वात मोठे अपडेट पॉवरट्रेन फ्रंटवर दिसत आहे, हे तंत्रज्ञान प्रथम नेक्सन इलेक्ट्रिकमध्ये वापरले गेले होते. या कारची इलेक्ट्रिक मोटर 75hp पॉवरची आहे. कंपनीने या कारमध्ये 26kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी वापरली आहे. नवीन झिपट्रॉन तंत्रज्ञानासह, टिगोर ईव्ही आता जलद चार्जिंगसह येते. फास्ट चार्जरमुळे ती फक्त 60 मिनिटांत 80 टक्के चार्ज होऊ शकते.