मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टाटा उद्योग समूह म्हणजे प्रामाणिकता हे समीकरण सामान्यांच्या मनात कायम आहे. मात्र, टाटा समूहाचा एक भाग असलेल्या टीसीएस कंपनीमध्ये घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. प्राप्त माहितीनुसार, टीसीएसमध्ये १०० कोटी रुपये कमिशनपोटी घेणाऱ्या चार जणांना निलंबित देखील करण्यात आले आहे.
टीसीएसमध्ये नोकरी लावून देण्याचे सांगत लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीतील काही बड्या अधिकाऱ्यांनी कन्सल्टन्सी स्टाफिंग फर्मकडून मोठे कमिशन घेतले. हा संपूर्ण भाग एका व्हिसलब्लोअरने उघड केला आहे, ज्याने या प्रकरणाची माहिती टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली. टीसीएसच्या रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपचे (आरएमजी) जागतिक प्रमुख ईएस चक्रवर्ती अनेक वर्षांपासून कर्मचारी कंपन्यांकडून त्यांना कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात कमिशन घेत असल्याचा आरोप व्हिसलब्लोअरने केला आहे.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर टीसीएसने त्याची चौकशी करण्यासाठी तीन उच्च अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली, ज्यामध्ये मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी अजित मेनन यांचाही समावेश होता. आठवड्याच्या तपासानंतर टीसीएसने चक्रवर्ती यांना रजेवर पाठवले आणि रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित केले. याशिवाय आयटी कंपनीने कर्मचारी भरती करणाऱ्या तीन कंपन्यांनाही काळ्या यादीत टाकले आहे.
मोठ्या हुद्द्यावर होते चक्रवर्ती
चक्रवर्ती १९९७ पासून टीसीएसमध्ये कार्यरत होते. ते थेट मुख्य कार्यकारी अधिकारी नटराजन गणपती सुब्रमण्यम यांना रिपोर्ट करायचे. रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपचे कार्यकारी अरुण जीके यांच्यावरही कारवाई करण्यात आली असून, त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. या दोघांशिवाय ज्या अधिकाऱ्यांवर टीसीएसने कारवाई केली, त्यांची नावे अद्याप समजलेली नाहीत. काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या तीन कर्मचाऱ्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.