मुंबई – देशातीलच नव्हे तर जगातील खासगी क्षेत्रातील अग्रगण्य पोलाद कंपन्यांमध्ये टाटा स्टिल उद्योगाचे नाव घेतले जाते. कोरोनाच्या परिस्थितीत उद्योग क्षेत्रात निराशेचे वातावरण असताना टाटा स्टिलने मात्र कर्मचार्यांना खुशखबर दिली आहे. कंपनीने आपल्या कर्मचार्यांना बोनसची भेट दिली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी बोनसच्या रूपाने एकूण २७०.२८ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, या आर्थिक वर्षात बोनससाठी टाटा स्टिल आणि टाटा कामगार संघटनेदरम्यान झालेल्या एका करारावर हस्ताक्षर करण्यात आले. कंपनीकडून सर्व विभागांच्या पात्र कर्मचार्यांना बोनस देण्यात येणार आहे. बोनसची कमीत कमी रक्कम ३४,९२० रुपये आणि जास्तीत जास्त रक्कम ३,५९,०२९ रुपये असेल.
कंपनी फायद्यात
३० जून २०२१ ला समाप्त झालेल्या तिमाहीमध्ये टाटा स्टिलला ९,७६८.३४ रुपयांचा फायदा झाला आहे. टाटा स्टिलला एक वर्षापूर्वी २०२०-२१ च्या समान काळात ४,६४८.१३ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तिमाहीच्या काळात कंपनीची मिळकत वाढून एकूण ५३,५३४.०४ कोटी रुपये इतकी झाली आहे. एका वर्षापूर्वी २५,६६२.४३ कोटी रुपये होती. कंपनीचा खर्च आधी २९,११६.३७ कोटी रुपयांच्या तुलनेत वाढून ४१,३९७.२३ कोटी रुपये इतका झाला आहे.