पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – भारतीय कॉर्पोरेट जगतातील प्रसिद्ध व्यक्ती एन चंद्रशेखरन यांना पहिल्यांदा 2017 मध्ये टाटा समूहाची कमान देण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाने नवीन उंची गाठली होती. आता एन चंद्रशेखरन यांची पाच वर्षांच्या कालावधीसाठी टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. टाटा समूहाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष रतन टाटा यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. याला मंडळाच्या सर्व सदस्यांनी एकमताने मान्यता दिली. त्यानंतर एन चंद्रशेखरन यांची पुन्हा एकदा टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून 5 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. एन चंद्रशेखरन यांचा पहिला कार्यकाळ या महिन्यात संपत आहे. सायरस मिस्त्री यांच्या जागी त्यांना पहिल्यांदा टाटा सन्सचे अध्यक्ष नेमण्यात आले होते.
त्यांचे पूर्ण नाव नटराजन चंद्रशेखरन आहे. तामिळनाडूतील नमक्कल जिल्ह्यातील मोहापूर गावात 1963 मध्ये त्यांचा जन्म झाला. एन चंद्रशेखरन यांचे सुरुवातीचे शिक्षण तामिळ माध्यमात तामिळनाडूतील सरकारी शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोईम्बतूर येथून पदवी व तिरुचिरापल्ली रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजमधून एमसीए म्हणजेच कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमध्ये मास्टर्स केले. तसेच त्यांनी IAM कोलकाता येथून MBA ची पदवी देखील घेतली आहे. एन चंद्रशेखरन यांनी 1987 मध्ये इंटर्न म्हणून TCS सह प्रवास सुरू केला. एन चंद्रशेखरन यांनी TCS या टाटा समूहाच्या कंपनीसोबत 30 वर्षांचा मोठा पल्ला गाठला आहे. या 30 वर्षांमध्ये कंपनीच्या एका सामान्य कर्मचाऱ्यापासून त्यांचा प्रवास झाला. सन 2009 मध्ये ते TCS चे CEO बनले होते. एन चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली टीसीएसने नवीन उंची गाठली. या काळात TCS चा नफा 30 हजार कोटी रुपयांवरून 1,20 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.
एन चंद्रशेखरन यांचे भारतीय कॉर्पोरेट जगतातील योगदान लक्षात घेऊन, सरकारने त्यांना यावर्षीचा देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण देऊन सन्मानित केले आहे. याशिवाय 2013, 2014, 2015 मध्ये सलग इंडिया टुडे ग्रुपकडून बेस्ट सीईओचा किताबही त्यांना मिळाला आहे. एन चंद्रशेखरन यांना ‘मॅरेथॉन मॅन’ म्हणूनही ओळखले जाते. एन चंद्रशेखरन यांनी आतापर्यंत मुंबई, टोकियो, न्यूयॉर्क, बर्लिन, शिकागो आणि बोस्टनसह अनेक ठिकाणी मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे. यासोबतच ते एक चांगले फोटोग्राफर देखील आहेत.