नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- २०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दीष्ट साध्य करण्याच्या भारताच्या प्रवासातील एका महत्त्वाच्या टप्प्यात, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज नवी दिल्लीत,हायड्रोजनवर चालणाऱ्या टाटा मोटर्स द्वारा आणलेल्या अवजड ट्रक्सना पहिल्या चाचणीसाठी हिरवा झेंडा दाखवला.
याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे. कार्बन उत्सर्जन कमी करुन आणि उर्जा स्वावलंबन वाढवून भारताच्या वाहतूक क्षेत्रात परिवर्तन घडवण्याची क्षमता यामध्ये आहे. अशा उपक्रमांमुळे अवजड ट्रक वाहतूकीतील शाश्वततेला गती मिळेल आणि आपण कार्यक्षम, कमी कार्बन उत्सर्जनाच्या भविष्याच्या दिशेने आणखी आगेकूच करू. हायड्रोजनवर चालणारी हरित व स्मार्ट वाहतूक सक्षम करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण टप्पा गाठण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मी टाटा मोटर्सचे अभिनंदन करतो.”
केंद्रिय नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले,“भारताच्या शाश्वत व शून्य कार्बन उत्सर्जनाच्या भविष्य निर्मितीसाठी हायड्रोजन हे महत्त्वाचे इंधन आहे.ही चाचणी म्हणजे भारताच्या वाहतूक क्षेत्रातून कार्बन कमी करण्यातील हरित हायड्रोजनची क्षमता दाखवून देण्यातील लक्षणीय टप्पा आहे. राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाचा एक भाग असलेला हा उपक्रम नवोन्मेषाला चालना देऊन जागतिक हवामान उद्दीष्टांमध्ये योगदान देतानाच भारताचे इंधन स्वावलंबनाचे उद्दीष्ट साध्य करण्याप्रतीच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबच आहे. या नवी सुरुवात करणाऱ्या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मी टाटा मोटर्सची प्रशंसा करतो.”
ही ऐतिहासिक चाचणी म्हणजे देशातील लांब पल्ल्याच्या माल वाहतूक क्षेत्रातील शाश्वततेच्या दिशेने टाकलेले उल्लेखनीय पाऊल आहे.कारण टाटा मोटर्सने शाश्वत वाहतूक पर्याय निर्मितीप्रती असलेली आपली वचनबद्धता अधोरेखित केली आहे आणि ती भारताच्या विस्तृत हरित उर्जा उद्दीष्टांशी सुसंगत आहे.कंपनीला या चाचणीसाठी निविदा देऊ केली गेली होती ज्यासाठी नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्रालयाने राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानांतर्गत निधी पुरवला जातो.
चाचणीचा हा टप्पा २४ महिन्यांचा असेल आणि हायड्रोजनवर चालणारी निरनिराळी वहनक्षमता व आकार असलेली १६ आधुनिक वाहने यासाठी वापरली जातील.अत्याधुनिक हायड्रोजन इंटर्नल कम्बशन इंजिन्स (H2-ICE) व इंधन सेल (H2-FCEV) तंत्रज्ञानाने सुसज्ज असे हे ट्रक भारतातल्या मालवाहतुकीच्या प्रमुख मार्गांवर चालवून त्यांची चाचणी घेतली जाईल.मुंबई, पुणे, दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, सुरत, वडोदरा, जमशेदपूर आणि कलिंगानगर शहरांच्या परिसरातील मार्गांचा यामध्ये समावेश आहे.
टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ कंपनीची सुसज्जता अधोरेखित करताना म्हणाले, “अधिक हरित, स्मार्ट व शाश्वत वाहतूक व्यवस्थेत रुपांतरित होण्याच्या भारताच्या उद्दीष्टपूर्तीच्या प्रवासात आघाडीवर राहता आले हा टाटा मोटर्स कंपनीला आपला बहुमान वाटतो.”