मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील मोठा आणि नावाजलेला उद्योगसमूह असलेल्या टाटा ग्रुपच्या (Tata Group) दोन कंपन्यांचे विलिनीकरण होणार आहे. टाटा कॉफी लिमिटेड (Tata Coffee Ltd) आणि टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (TCPL) या दोन्ही कंपन्यांचे येत्या १२ ते १४ महिन्यांमध्ये विलिनीकरण होणार आहे. दोन्ही कंपन्या नियामकीय प्रक्रियेचा भाग बनण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत.
टाटा कॉफी लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि मुख्य वित्त अधिकारी के. वेकटरमणन यांच्याकडून गुंतवणूकदारांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत ते म्हणाले, की दोन्ही कंपन्यांचे विलिनीकरण होण्यासाठी १२ ते १४ महिने लागणार आहेत. त्याची मुदत तितकीच आहे.
टीसीपीएलने सर्व टाटा कॉफीच्या व्यवसायांचे विलिनीकरण त्याच्या आणि त्यांच्या उपकंपन्यांसोबत करण्याचे जाहीर केले आहे. कंपनीच्या पुनर्रचनेचा भाग म्हणून समन्वय आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी धोरणात्मक प्राधान्य दिले जाणार आहे. या विलिनीकरण योजनेंतर्गत टाटा कॉफीच्या भागधारकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक १० इक्विटी समभागांमध्ये टीसीपीएलचे तीन इक्विटी शेअर्स मिळतील.
टाटा कॉफीच्या शेअरची किंमत २२१.२० रुपये आणि टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या शेअरची किंमत ८२४.३५ रुपये आहे.याच वर्षी या शेअरने आतापर्यंत १०.२१ टक्के परतावा दिला आहे. टाटा कॉफीच्या शेअरने या वर्षी ३.३४ टक्क्यांनी उसळी घेतली आहे.