विशेष प्रतिनिधी, मुंबई
भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने (सीसीआय) टाटा ग्रुपच्या बिग बास्केटमध्ये ६४.३ टक्क्यांची भागिदारी घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या डीलमुळे भारतातील ऑनलाइन किराणा बाजारात टाटा समुहाची स्थिती भक्कम होणार आहे.
टाटा समुह आधीपासूनच अनेक क्षेत्रात आहे. या डीलनुसार सुपर मार्केट ग्रॉसरी सप्लाइज प्रायव्हेट लिमिटेड (एसजीएस) चे ६४.३ टक्के शेअर्सची खरेदी टाटा डिजिटल लिमिटेड (टीडीएल) करणार आहे. तसेच एसजीएसचे नियंत्रण असलेल्या इनोव्हेटिव्ह रिटेल कॉन्सेप्ट्स प्रायव्हेट लिमिटेडलाही टाटा समुह खरेदी करणार आहे.
एक किंवा त्याहून अधिक टप्प्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या खरेदीच्या प्रक्रियेत एसजीएसच्या ६४.३ टक्क्यांच्या शेअर्सची खरेदी टाटा डिजिटल लिमिटेड करू शकते. वाणिज्य मंत्रालयाकडून गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, एसजीएस वेगळ्या ट्रॅन्जॅक्शनच्या माध्यमातून रिटेल कॉन्सेप्ट्स प्रायव्हेट लिमिटेडवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकणार आहे.










