मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एअर इंडियानंतर रतन टाटा आणखी एक तोट्यात चाललेली सरकारी कंपनी विकत घेणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिमाहीत टाटा समूह आपला ताबा घेणार आहे. टाटा स्टीलने ही माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियानंतर आता टाटा समूह आणखी एका सरकारी कंपनीचा ताबा घेणार आहे. टाटा स्टीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन यांनी मंगळवारी याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, कंपनी चालू तिमाहीच्या अखेरीस नीलाचल इस्पात निगम लिमिटेड (NINL) चे अधिग्रहण पूर्ण करेल. NINL चे हे संपादन टाटा स्टीलसाठी एक मोठे उत्पादन कॉम्प्लेक्स तयार करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. NINL हा ओडिशा सरकारच्या चार CPSE आणि दोन राज्य PSU चा संयुक्त उपक्रम आहे.
नरेंद्रन यांनी पत्रकारांना सांगितले, “चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत NINL चे अधिग्रहण पूर्ण केले जाईल आणि आम्ही आमच्या मुल्यांनुसार किरकोळ व्यवसायाच्या विस्ताराला चालना देण्यासाठी प्रयत्न करु.” ३१ जानेवारी रोजी या कंपनीच्या खरेदीसाठी बोली जाहीर करण्यात आली होती. ओडिशा स्थित पोलाद निर्मात्या NINL मध्ये १२ हजार १०० कोटी रुपयांची ९३.७१ टक्के भागीदारीसाठी ही बोली लावण्यात आली होती.
NINL चा कलिंगनगर, ओडिशा येथे १.१ मेट्रिक टन क्षमतेचा एकात्मिक स्टील प्लांट आहे. कंपनीचे मोठे नुकसान होत आहे आणि ३० मार्च २०२०पासून प्लांट बंद आहे. कंपनीकडे गेल्या वर्षी ३१ मार्चपर्यंत ६६०० कोटी पेक्षा जास्त कर्जे आणि थकबाकी आहेत, ज्यामध्ये प्रवर्तक (४११६ कोटी), बँका (१७४१ कोटी), इतर कर्जदार आणि कर्मचाऱ्यांची मोठी देणी समाविष्ट आहे. ३१ मार्च २०२१ रोजी कंपनीची मालमत्ता ३४८७ कोटी ऋण होती आणि ४२२८ कोटींचे नुकसान झाले.