मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एअर इंडियाला टेकओव्हर केल्यापासून टाटा समूहाकडून झपाट्याने पावले उचलली जात आहेत. एअर इंडियाने तब्बल ४७० विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ६.४० लाख कोटींचा करारही केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या करारासाठी टाटा समूहाचे अभिनंदन केले आहे.
एअर इंडियाचा डोलारा सांभाळण्यासह या कंपनीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून गेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आणि त्याचाच भाग म्हणून मोठा निर्णय घेतला आहे. मोठ्या संख्येने विमान खरेदीचा हा विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठा करार असल्याचे मानले जात आहे. एअरबस आणि बोइंगकडून एकूण ४७० वाइड बॉडी आणि नॅरो बॉडी विमाने खरेदी करणार आहेत. यात ४० एअरबस ए ३५० एस, २० बोइंग ७८७ आणि १० बोइंग ७७७-९ एस वाइड बॉडी विमानांचा समावेश आहे. एअरलाइन सुरक्षा, ग्राहक सेवा, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, नेटवर्क आणि मानव संसाधनांच्या दिशेने मोठ्या परिवर्तनावर भर दिला जात असल्याचे टाटा समूहाने म्हटले आहे.
जो बायडेन यांनीही केले अभिनंदन
टाटा समूहाची एअर इंडियाने फ्रान्सच्या एअरबस कंपनीकडून २५० विमाने खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये ४० वाइड बॉडी ए-३५० विमाने आणि २१० नॅरो बॉडी विमानांचा समावेश आहे. ऑर्डर वाढवण्याचा पर्यायही करारात ठेवण्यात आला असल्याची माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी दिली आहे. टाटा समूह एकूण ४७० विमाने खरेदी करणार आहे. टाटाने विमान वाहतूक क्षेत्रातील आघाडीची कंपनी, अमेरिकेची बोइंग आणि युरोपची एअरबस यांच्याशी हा करार केला आहे. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या करारासाठी भारताचे अभिनंदन केले आहे.
मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती
भारतीय कंपनीने केलेल्या या करारामुळे अमेरिकेत १० लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असून भारतातही मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे मानले जात आहे.
Tata Air India 470 Aircraft Order Global Impact