समाज माध्यमांच्या प्रभावी माध्यमांची गरज!
समाजमाध्यमे ही एक महत्त्वाचे व मोठे शस्त्र आहे. त्याचा वापर आपण कसा, किती आणि कुठे करतो यावर सारे काही अवलंबून आहे. अनेक संकटे आणि समस्यांवर समाज माध्यमांनी उत्तम तोडगा काढला आहे. हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
[email protected]
मी पाच जानेवारी २०२१ रोजी माझ्या वैयक्तिक ब्लॉगवर (www.ashokpanvakar.com ) एक पोस्ट लिहिली होती. तिचा काही भाग आज पुन्हा शेअर करण्याचा मोह होतो आहे. – ”कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन झाल्यावर अनेक ज्येष्ठ नागरिकांची खूप अडचण झाली. रोजच्या जीवनावश्यक वस्तू घरात आणणे ही सुद्धा अडचणीची गोष्ट झाली. अशावेळी शेजारी-पाजारी अथवा मित्रमंडळींनी त्यांना जमेल तितकी मदत केली. अशा परिस्थितीत बेंगळुरूच्या ३९ वर्षीय महिता नागराज यांना ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका मैत्रिणीचा फोन आला. या मैत्रिणीचे वृद्ध आईवडील बेंगळुरूत राहतात आणि त्यांना मदतीची गरज आहे, काही करता येईल का, असे तिने महिता याना विचारले. महिता यांनी आवश्यक ती मदत तातडीने केली. परंतु, अशा प्रकारची मदत अनेकांना लागत असेल हे त्यांच्या लक्षात आले.
त्यामुळे त्यांनी एक चळवळ उभारायचे ठरवले. त्यातून स्थापना झाली ‘Caremongers India’ नावाची संघटना. अडचणीतल्या लोकांना मदत करायची इच्छा कोणाला आहे, असे त्यांनी फेसबुकवर विचारताच काही हजार लोकांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रत्येकाने जमेल तसे अडचणीतल्या लोकांना मदत करायला सुरुवात केली. हे काम सोयीचे व्हावे म्हणून त्यांनी फेसबुक ग्रुप सुरु केला, आज त्यांच्या कामात थोड्याथोडक्या नव्हे तर ५५,००० स्वयंसेवकांचा समावेश आहे. म्हणजे किती स्तरावर हे चांगले काम चालले असेल ते लक्षात येते. महिता फक्त फेसबुकपुरत्या थांबल्या नाहीत. त्यांनी whatsapp ग्रुपही केले आणि अधिक लोकांना जोडून घेतले. त्यांना मदतीसाठी रोज ८०० ते १५०० फोन येतात. तसेच whatsapp व SMS द्वारे २५०० लोक सपंर्क साधतात. त्यांना सर्व स्वयंसेवकांच्या मदतीने आधार देण्यात आला.
त्यांना फक्त बेंगळुरूमधूनच फोन येतात असे नाही, अन्य राज्यांमधूनही येतात. एकदा केरळमधील एका तान्ह्या मुलाला ७२ तासांच्या आत एक विशिष्ट इंजेक्शन देण्याची गरज आहे असे त्यांना कळले. ते इंजेक्शन सहज उपलब्ध होत नव्हते. महिता यांनी स्वयंसेवकांच्या मदतीने ते शोधले. ते पुण्यात उपलब्ध असल्याचे त्यांना कळले. तातडीने ते मिळवून ४८ तासांच्या आत त्या मुलाला मिळेल अशी व्यवस्था केली. विशेष म्हणजे ज्या हजारो लोकांना त्यांनी व स्वयंसेवकांनी मदत केली त्यांना त्या प्रत्यक्षात एकदाही भेटल्या नाहीत. सारे काही फेसबुक आणि whatsapp च्या माध्यमातून चाललेले असते. हे काम प्रामुख्याने चार गटातल्या लोकांसाठी चालते. १. ज्येष्ठ नागरिक २. शारीरिकदृष्ट्या अपंगत्व असलेले लोक. ३. बारा महिन्यांच्या खालील वयोगटातील अर्भके ४. ज्याना अन्य गंभीर आजार आधीपासून आहेत असे लोक.”
समाजमाध्यमांचा किती प्रभावी वापर होऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. हे उदाहरण पुन्हा अशासाठी द्यावेसे वाटले की अशा अनेक उदाहरणांची आज गरज आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर कोरोना पुन्हा वेगाने वाढत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयावह स्वरूप धारण करील अशी भीती प्रत्यक्षात येऊ पाहात आहे. ”आता लस आली आहे, आपण निर्बंध पाळले नाहीत तरी चालेल ” अशाच भावनेतून लोक वागायला लागले.
आज लोकांना निर्बंध पाळायला सांगणाऱ्या नेत्यांनी मोठ्या गर्दीचे राजकीय मेळावे, लग्नसमारंभ याना हजेरी लावायला सुरुवात केली आणि आपण नक्की वागायचे कसे याबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला. खरे म्हणजे राजकीय नेत्यांनी स्वतःचे वर्तन आदर्श ठेवायला हवे होते. तसे काही नेत्यांच्या बाबतीत दिसले नाही. रस्त्यावरची बेबंद गर्दी वेगवेगळ्या कारणामुळे होती. कामावर जाण्याशिवाय पर्याय नाही म्हणून अपरिहार्यपणे रस्त्यावर आलेले लोक, भाज्या, औषधे आदी जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी आलेले लोक आणि आता निर्बंधांची गरज नाही असे वाटून मुक्तपणे (मास्कशिवाय) फिरणारे लोक अशा सगळ्यांनी गर्दी केली. त्याचा परिणाम काय झाला हे आपण पाहतो आहोतच.

आज बऱ्याच रुग्णालयांमध्ये नवीन रुग्णाला जागा उरलेली नाही. आपल्याला कोरोना झाल्यावर जेवढी भीती वाटत नाही त्याच्यापेक्षा जास्त भीती रुग्णालयात जागा मिळेल का याची वाटते अशी स्थिती आहे. त्यातच लसीच्या पुरवठ्यावरून वाद झाल्याने आजच्या घडीला बऱ्याच ठिकाणचे लसीकरण बंद झाले आहे. ते एकदोन दिवसात सुरु होण्यासारखे असले तरी नियमित लसीकरण चालू राहील का याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. या सगळ्या गदारोळात समाजमाध्यमांची आज फार गरज आहे असे मला वाटते.
आज बऱ्याच ठिकाणी Whatsapp , फेसबुकसारख्या माध्यमातून कोरोना रुग्णांना मदत करण्याचे काम चालू आहे. हे काम बरेचसे वैयक्तिक पातळीवर चालते. हे काम वर्तमानपत्रे किंवा टीव्ही चॅनेल करू शकणार नाहीत.
गुरुवारचे उदाहरण देतो. मुंबईत लशीअभावी अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली. ज्यांचे त्या दिवशी लसीकरण होणार होते त्यांना कोणतीही अधिकृत माहिती मिळत नव्हती. मोठ्या दैनिकांनीही मोघम बातम्या छापल्या होत्या. मुंबईपुरते बोलायचे तर लसीकरणासाठी बीकेसी व नेस्को मैदान या दोन मोठ्या सोयी महापालिकेने केल्या आहेत. कितीही गर्दी असली तरी तेथील काम अतिशय नियोजनबद्ध, शिस्तबद्ध पद्धतीने चालते असा माझा अनुभव आहे.
शिवाय इतर सरकारी व खासगी रुग्णालयांतही बऱ्यापैकी शिस्त पाळली जाते. परंतु, लसीच्या तुटवड्यामुळे गुरुवारी आपल्याला लस मिळणार की नाही, याची माहिती थेट बातमी हवी होती, ती कोणीही प्रसिद्ध केली नाही. वाचकाला थेट बातम्या लागतात. ‘मला आज लस मिळणार की नाही हे सांगा” असे त्याचे म्हणणे असते. त्याची नेमकी माहिती न मिळाल्याने हजारो लोकांची गैरसोय झाली. अशा वेळेस समाजमाध्यमांचा वापर प्रभावीपणे झाला असता तर सारा गोंधळ टळला असता.
