”नैर्ऋत्य मोसमी पावसाचा दिलासादायक अंदाज भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी जाहीर केला. यंदा देशात ९८ टक्के म्हणजेच सर्वसाधारण पाऊस होणार आहे. महाराष्ट्रातील पावसाचा टक्काही सर्वसाधारण राहणार असून, मुंबईसह कोकण विभाग, विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. देशात एकूण पावसापैकी ७५ टक्के वाटा नैर्ऋत्य मोसमी पावसाचा असतो. बहुतांश कृषी व्यवस्था आणि पाण्याची उपलब्धता याच पावसावर अवलंबून असते. पाऊसपाण्याचा अर्थव्यवस्थेवरही त्याचा थेट परिणाम होतो. ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण समजला जातो. त्यानुसार यंदा ९८ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.”
कोरोना, मृत्यू, रुग्णालय, प्राणवायूची कमतरता अशा साऱ्या नकारात्मक बातम्यांच्या पार्श्वभूमीवर पावसाची ही बातमीच अतिशय सुखद ठरली यात वाद नाही. गेल्या काही वर्षांत पावसाचे चक्र बदलले आहे.जूनचा पहिला आठवडा महाराष्ट्रात पाऊस घेऊन येतोच हे गणित बिघडून काही वर्षे झाली. तरी गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. नवी दिल्लीच्या ‘राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्रातील वैज्ञानिक आर. के. जेनमणी यांच्या म्हणण्यानुसार एक जून २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या काळात सरासरी ९५.४ सेंटीमीटर पाऊस पडला. १९६१ ते २०१० या काळातील सरासरीच्या विचार केला तर ती ८७.७ सेंटीमीटर आहे, म्हणजेच त्या सरासरीपेक्षा गेल्या वर्षी त्या विशिष्ट काळात जास्त पाऊस झाला.
माणूस विविध मार्गाने निसर्गाला आपल्यापुढे झुकविण्याचा प्रयत्न करत असला तरी गेल्यावर्षी वरुणदेव आपल्यावर मेहेरबान झाला होता. २०२१मध्ये तितका नाही तरी त्याच्या ९८ टक्के ‘नॉर्मल’ असेल असे हवामान खाते म्हणते. हवामान खात्याने वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजावर वर्षभर कितीही विनोद होत असले तरी मार्च ते मी महिन्यात पावसाचा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा यांबाबत जाहीर होणाऱ्या अंदाजाबाबत खूप उत्सुकता असते. आणि या अंदाजाने आपण सारे जण सुखावतोही. हवामान खाते आता बऱ्यापैकी अचूक अंदाज वर्तवते, त्यामुळे हा आनंद जास्त काळ टिकेल अशी आशा करूया.
पाऊस चांगला होणार या बातमीनंतर काळजी वाटते ती पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवण्याची. जलसिंचनाची, जलसाठ्यांची यंत्रणा कशी आहे यावर या पावसाचा आनंद मिळणार का हे अवलंबून असते. नाहीतर पाऊस मुबलक, पण लोकांना पिण्यासाठी पाणी नाही, अशी परिस्थिती होते. यापुढची युद्धे पाण्यासाठी होतील असे वाक्य बऱ्याचवेळा ऐकले. पडणाऱ्या पावसाचे नियोजन (साठा) नीट झाला नाही तर पावसावर दोष देण्यात काहीच अर्थ नाही.
योगायोगाने Centre for Science and Environment (CSE) च्या प्रमुख सुनीता नारायण यांचा पावसाबाबतचा लेखही ‘यंदाचा पाऊस ९८ टक्के पडणार ‘ ही बातमी प्रसिद्ध झाली त्याच दिवशी वाचायला मिळाला. भारतात ब्रिटिश येण्यापूर्वी पाणी साठविण्याची पद्धत कशी होती (अगदी जैसलमेर सारख्या अत्यंत ‘कोरड्या’ शहरात एका हेक्टर जमिनीवर दहा लाख लिटर पाणी साठवले जात असे) ,प्रत्येक राज्यात पाणी साठवण्याची अत्यंत वैज्ञानिक पद्धती कशी होती, ब्रिटिशांनी ती कशी बंद केली व कालवे आणि एकीकडचे पाणी दुसरीकडे वाळविण्यावर कसा भर दिला, भारताने स्वातंत्र्य मिळाल्यावरही हीच धोरणे कशी राबवली, आणि आता मनरेगा योजनांच्या मदतीने परत विविध जलसाठे निर्माण करून कसे वापरले जात आहेत, याचा उहापोह सुनीता नारायण यांच्या लेखात वाचायला मिळतो. जिज्ञासूंनी हा लेख मुळापासून वाचण्यासारखा आहे. (https://timesofindia.indiatimes.com/ancient-india-harvested-every-drop-of-rain-we-must-restore-this-science/articleshow/82107045.cms)
पाणी साठवण्याच्या अनेक पद्धती विविध राज्यांत अस्तित्वात आहेत. त्या जपल्या गेल्या पाहिजेत. गेल्या काही वर्षांत मुंबईसारख्या महानगरात ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ हे शब्द प्रत्येकाच्या तोंडात रुळले होते. परंतु त्या दृष्टीने फार काम झाले आहे असे दिसत नाही. मुंबईत नवीन इमारती बांधताना या पाणी साठवण्याच्या यंत्रणेचा वापर केला गेलाच पाहिजे असा नियम आहे, परंतु तो किती टक्क्यांनी पाळला हे गुलदस्त्यातच आहे. अशा वेळेस बिहारमधील कोठीलावा खेड्यातील लौंगी भुईयान नावाच्या वयस्कर माणसाचे कौतुक वाटल्यावाचून राहत नाही. पहाडी भागातले ही खेडे.
पाऊस आला तरी पाणी वाहून जाते. शेतीला काही फायदा होत नाही आणि कोणीही सरकारी यंत्रणा मदत करत नाही हे लक्षात आल्यावर त्याने एकट्याने तीन किलोमीटर लांबीचा कालवा खणला. ते पाणी साठून राहील याची सोया केली आणि शेती केली. अशा कथा फक्त प्रसिद्धीमाध्यमात वाचून सोडून देण्यासारख्या नाहीत. महाराष्ट्रातही अनेक गावांमध्ये गावकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या पाण्याची सोया केल्याच्या बातम्या अधूनमधून वाचायला मिळतात. सरकारी जलसिंचनापेक्षा आपले श्रमदान फायद्याचे हा विचार यामागे असू शकतो. त्यांची शेती आणि रोजचे जगणे या पाण्यावर अवलंबून असल्याने त्यांनी हे केले हे म्हणणे फार सोपे आहे. त्यांना पाण्याचे महत्व कळले आहे, आणि मुंबईसह बऱ्याच शहरांना ते कळले नाही असेच म्हणायचे का?
मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे प्रमाणाबाहेर पाऊस पडला की मुंबईची तुंबई होते हे आपण पाहिले आहेच. हा भौगोलिक दोष खरा आहे, पण त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न मुंबईने केला का हा खरा प्रश्न आहे. त्याचे उत्तर नकारार्थी आहे. देशातील मोठी शहरे जेव्हा पाणी साठवण्यास शिकतील तेव्हाच ‘यंदाचा पावसाळा नॉर्मल’ या बातमीचा आनंद घेता येईल.
यासाठी जलसुरक्षा हा विषय खूप महत्वाचा आहे. विविध कारणांमुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे आणि दरवर्षी गेल्या वर्षीचा उन्हाळा बरा होता, असे म्हणायची पाळी येते आहे. वृक्षलागवडीपेक्षा जंगले साफ होण्याच्याच बातम्या जास्त वाचायला मिळतात. अशा काळात पाऊस चांगला होणार ही बातमी सुखावून गेली तरी आपल्याला या एकाच वर्षाचा नव्हे तर पुढील अनेक वर्षांचा विचार करायचा आहे, याचे भानही ठेवलेले बरे !
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!