मुंबई – इडियट बॉक्सवरील सर्वाधिक हिट ठरलेली मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ यातील पात्रांच्या व्यक्तिगत जीवनाबाबतही लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या शोमधील प्रत्येक पात्र लोकांच्या मनात बसलेले आहे. जेठालाल असो, बाबूजी असो, भीडे-माधवी किंवा बबिबा-अय्यर असो. प्रत्येक पात्र लोकांच्या जीवनाचा भाग होऊन बसले आहे. मात्र या सर्वांमध्ये आपल्या लग्नासाठी चिंतीत असलेला पत्रकार पोपटलाल सुद्धा लोकांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे.
गोल्डन क्रो अवॉर्ड विनर वरीष्ठ युवा पत्रकार पोपटलाल याचे एकच स्वप्न आहे की त्याला लवकरात लवकर एक अविवाहित तरुणी भेटावी व तिच्यासोबत त्याचे लग्न व्हावे. सोसायटीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर पोपटलालसाठी नवरी शोधण्याची जबाबदारी आहे. एखाद्याला आपल्या जबाबदारीचा विसर पडला तर स्वतः पोपटलाल त्याची आठवण करून देतात. हे पात्र साकारणाऱ्या कलावंताचे नाव आहे श्याम पाठक. शाम यांना सीए व्हायचे होते मात्र मध्येच त्यांना अभिनयाचा असा छंद जडला की सीएचा अभ्यास सोडून त्यांनी नॅशनल स्कूल आफ ड्रामामध्ये (एनएसडी) प्रवेश घेतला. तिथेच रेश्मीसोबत त्यांची भेट झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात आणि प्रेमाचे लग्नात झाले. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. तायवान भाषेतील चित्रपटाने श्याम पाठक यांचे करीयर सुरू झाले. त्यानंतर त्यांनी ‘जशोदाबेन जयंतीलाल जोश की जॉईंट फॅमिली’, ‘सुख बाय चांस’ या मालिकांमध्ये काम केले. मात्र त्यांना खरी ओळख ‘तारक मेहता का उलटा चष्मा’मुळेच झाली.