विशेष प्रतिनिधी, मुंबई
टीव्ही वरील हिंदी मालिका तारक मेहता का उलटा चश्मा ही घराघरात लोकप्रिय आहे. याच मालिकेत नट्टू काका ची भूमिका साकारतात प्रसिद्ध अभिनेते घनश्याम नायक. त्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व अनेकदा त्यांचे दुकान मालक जेठालाल यांची विकेट घेत असते. गेल्या काही आठवड्यांपासून नट्टू काका हे तारक मेहतामध्ये दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये शंका निर्माण झाली आहे. दया भाभी नंतर आता नट्टू यांनी ही मालिका सोडली का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. मात्र, नट्टू काका सध्या का नाहीत त्याची उकल झाली आहे.
७७ वर्षीय घनश्याम नायक सध्या कर्करोगाशी लढा देत आहेत. हा आजार झाला असल्याचे गेल्या महिन्यातच त्यांना समजले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. घनश्याम नायक यांचा मुलगा विकास म्हणाला की, तीन महिन्यांपूर्वी माझ्या वडिलांच्या गळ्यालगत काही डाग दिसले. त्यानंतर आम्ही डॉक्टरांना दाखविले. काही चाचण्या करुन पुढील उपचार सुरू करण्यात आले. गळ्याचे ऑपरेशन करण्यात आले असून एकूण ८ गाठी काढून घेण्यात आल्या आहेत. यामुळे त्यांनी टीव्ही शोमधून ब्रेक घेतला, असे विकास यांनी सांगितले.









