मुंबई – टीव्हीवरील अनेक मालिका प्रेक्षकांना आवडतात. त्यातही मोजक्याच काही मालिका अतिशय लोकप्रिय होतात. काही मालिका २ ते ३ वर्ष सुरू राहतात. परंतु एक मालिका अशी आहे जी गेल्या एक तपापासून (१२ वर्षे) प्रेक्षकांची आवडती बनलेली आहे, ती म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’.
‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही मालिका देशातील सर्वाधिक काळ चालणारी मालिका आहे. या मालिकेचा शुभारंभ २८ जुलै २००८ मध्ये झाला. तेव्हापासूव अव्याहतपणे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मालिकेला आहे. या कार्यक्रमात अनेक कलाकार आले आणि गेले, पण प्रेक्षकांचे यावर प्रेम कधीच कमी झालेले नाही. सुरुवातीपासून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ही मालिका कायम स्मितहास्य आणते. प्रेक्षकांना गोकुळधाम सोसायटी आणि तिथले लोक खूप आवडतात आणि प्रत्येकाचे नावही सर्वांना तोंडपाठ झाले आहे.
गोकुळधाममधील रहिवासी प्रेक्षकांसाठी कुटुंबाचा भाग बनले आहेत. मालिकेतील जेठालाल, दयाबेन, चंपकलाल, भिडे मास्टर आणि इतर पात्रांसह गोकुळधाम सोसायटी देखील आवडते. या मालिकेमुळे गोकुळधाम सोसायटी केवळ शुटिंग सेटच राहिलेली नाही, तर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रही बनली आहे. गोकुळधाम सोसायटीचा हा संपूर्ण सेट गोरेगाव येथे तयार करण्यात आला आहे. मुंबईला आलेले अनेक पर्यटक येथे भेट देण्यास येतात. ते निश्चितपणे गोकुळधामबद्दल विचारतात. पण आता कोरोनामुळे गोकुळधाम सोसायटी बंद पडली आहे.
सध्या गोकुळधामचे कलाकार आपापल्या स्वतःच्या खऱ्या घरांमध्ये राहतात, शुटिंग पूर्णपणे बंद असल्याने सोसायटी मात्र निर्जन आहे. जेठालाल, बबिता, भिडे, पोपटलाल किंवा सोढी यांच्या घरात जेव्हा एखादे दृश्य दाखवले जाते, तेव्हा येथे त्याचे चित्रीकरण सोसायटीत केले जात नाही, परंतु कांदिवली येथे शोच्या अंतर्गत शुटिंगसाठी एक खास सेट तयार केला गेला आहे. फक्त कंपाऊंड, बाल्कनीसाठी शुटिंग करायचे असेल तर सोसायटीचा हा भाग वापरला जातो, तर फ्लॅटमधील शुटिंगसाठी मात्र कांदिवलीमध्येच केले जाते. त्यामुळे तुम्हाला गोकुळधाम सोसायटीतत राहण्याची इच्छा असेल तर ती कधीच पूर्ण होणार नाही, हे अधोरेखित होते.