विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोनापासून वाचण्यासाठी सरकारने जे नियम घालून दिले आहेत, त्याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. नाहीतर हा आजार कधीच संपुष्टात येणार नाही. केवळ सरकारला दोष देऊन काहीही होणार नाही, अशा शब्दांत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील जेठालाल अर्थात दिलीप जोशी यांनी नागरिकांची कानउघाडणी केली आहे.
हा आजार लवकरच संपेल, असा मला विश्वास आहे. पण, लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. हा लॉकडाऊन जेव्हा संपेल, तेव्हा लोकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. विनाकारण बाहेर पडणे, लोकांनी टाळणे आवश्यक असल्याचेही जोशी यांनी सांगितले.
कोरोनापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क लावणे, नियमितरित्या वाफ घेणे, लस घेणे या गोष्टी करणे गरजेच्या आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे चित्रीकरण सध्या बंद आहे. याबाबत ते म्हणाले की, हे काम आहे, लवकरच सुरू होईल. पण, लोकांचे आयुष्य जास्त महत्त्वाचे आहे. काही लोक दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन चित्रीकरण करत आहेत.
मला खात्री आहे की, हे सर्वजण योग्य ती काळजी घेत असतील. इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा परिवार आणि सर्व निकटवर्तीयांची सुरक्षितता जास्त महत्त्वाची असल्याचे या काळात लक्षात आल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. पैसा, मानमरातब हे सगळे गौण आहे. यासाठी लोकांनी धैर्य आणि संयम दाखवणे गरजेचे आहे.