विशेष प्रतिनिधी, मुंबई
टीव्हीवरील कॉमेडी मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ अत्यंत लोकप्रिय असून या मालिकेतील कलाकारांचे देखील समाजात मोठे चाहते आहेत. या मालिकेमध्ये प्रत्यक्ष पडद्यावर आणि पडद्यामागे काहीही घडले तरी त्याची लगेच चर्चा होते. सध्या देखील अशीच एक चर्चा रंगली आहे. या मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने गरोदर (प्रेग्नेंट) असल्यामुळे या मालिकेत काम करणे सोडल्याची चर्चा आहे. मात्र ही अफवा असल्याचे सांगत या चर्चेचे तिने खंडन केले आहे.
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेत रोशन सिंग सोढीची पत्नी रोशन भाभीची भूमिका अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने साकारली आहे. त्यामुळे ती अतिशय लोकप्रिय आहे. पारशी असलेली रोशन ही शिख असलेल्या रोशन याच्याशी विवाहबद्ध आहे, असे मालिकेत दाखविण्यात आले आहे. जेनिफर हिने गर्भावस्थेमुळे शो सोडल्याच्या वार्ता आहेत. यासंदर्भात जेनिफरने मोठा खुलासा केला आहे.
जेनिफर म्हणाली की, अशा बनावट बातम्यांमुळे तिला खूप त्रास होत आहे. तसेच तिचे चाहते देखील संभ्रमित आहेत. याबाबत जेनिफरने इंस्टा स्टोरीमध्ये लिहिले आहे की, मी ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका सोडलेली नाही. जर कोणी शोमध्ये दिसत नसेल तर याचा अर्थ असा नाही की तो शोचा भाग नाही. त्याचे एक वैयक्तिक कारण देखील असू शकते. त्याचवेळी जेनिफरने तिच्या अनुपस्थितीचे कारण उघड केले आहे.
जेनिफर म्हणाली की, दमण दौऱ्यातील शुटींगच्या वेळापत्रकात माझा समावेश करु नये, अशी विनंती मी निर्मात्यांना केली. कारण माझ्या पायाच्या टाचांमध्ये खूप वेदना होत्या. त्यामुळे चालणेही कठीण जात होते. त्याच काळात काही दिवस तीव्र ताप आला. मला कोरोना झाला नव्हता, परंतु त्याची चिंता होती. आता मी शोमध्ये सहभागी होण्यासाठी तयार आहे.
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ हा छोट्या पडद्याचा एक अत्यंत यशस्वी व लोकप्रिय कार्यक्रम आहे. या मालिकेचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे शोचे सर्व कलाकारही चर्चेत आहेत. जेनिफरच्या या खुलाशामुळे तिच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.