विशेष प्रतिनिधी, मुंबई
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील बबिताची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता सध्या चांगलीच चर्चेत आहे. एका युट्यूब व्हिडीओ दरम्यान मुनमुनने आक्षेपार्ह विधान केले आणि त्यावरून सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ उडाला. अखेर सोमवारी ट्विटरवर #ArrestMunmunDutta ट्रेंड होऊ लागले. एकंदरीत या सगळ्या प्रतिक्रिया पाहता मुनमून दत्ताने इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकून माफी मागितली.
मुनमून म्हणते, मी पोस्ट केलेल्या एका व्हिडीओसंदर्भात मी ही माफी मागते आहे. यात मी वापरलेल्या एका शब्दाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. कोणाचाही अपमान करण्याच्या दृष्टीने मी हा व्हिडीओ टाकला नव्हता. माझी भाषा कच्ची असल्याने मी वापरलेल्या शब्दाचा योग्य अर्थ मला माहीत नव्हता. त्याचा अर्थ कळल्यावर मी लगेचच हा शब्द काढून टाकल्याचेही ती सांगते.
मुनमून माफी मागताना म्हणते, प्रत्येक धर्म, जातीचा मी आदर करते. पण, त्या शब्दाचा उपयोग केल्याने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी माफी मागते.
पण मुनमूनच्या या माफीनाम्यावर दिग्दर्शक नीरज घेवान याने म्हटले आहे की, चुकीचा अर्थ काढला गेला?, कोणच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता?, तुमच्या माहितीस्तव सांगतो, या शब्दाची दुसरी कोणतीच व्याख्या असू शकत नाही.
मुनमून दत्ता सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपले काम आणि वैयक्तिक आयुष्य चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही वर्षांपूर्वी ‘मी – टू’ मोहिमेअंतर्गत आपल्या आयुष्यातील अनेक धक्कादायक गोष्टी उघड केल्या होत्या.
— Munmun Dutta (@moonstar4u) May 10, 2021