इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन तब्बल ४० आमदार फुटले आहेत. त्यामुळे मोठा राजकीय भूकंप झाला. महाविकास आघाडीची सत्ता गेली आणि आता बंडखोर शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार स्थापन झाले आहे. तर, सेनेत अजूनही पडझड होतच आहे. अशाच प्रकारे तामिळनाडूमध्ये राजकीय भूकंपाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, ही स्थिती निवळली आहे. तामिळनाडूमधील अण्णा द्रमुकच्या महापरिषदेने पक्षाचे हंगामी सरचिटणीस म्हणून इडापडी के. पलानीस्वामी यांची निवड केली आहे. तर पक्षात बंडखोरी करु पाहणारे ओ. पनीरसेल्वम यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. तत्पूर्वी पनीरसेल्वम यांनी पक्षाच्या महापरिषदेची सभा होऊ नये यासाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती, पण न्यायालयाने ही मागणी फेटाळली.
महापरिषदेत हे ठराव मंजूर झाल्याने आता इ. पलानीस्वामी हेच पक्षाचे एकमेव नेते बनले आहेत. पक्षाची दुहेरी नेतृत्वाची पद्धत यामुळे संपुष्टात आली आहे. २०१७ मध्ये पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम यांचे गट एकत्र आल्याने त्या दोघांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारले होते. मात्र आता पनीरसेल्वम यांना पक्षाच्या कोषाध्यक्षपदावरून तर काढले आहेच, पण त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द केले आहे. यानंतर संघटनात्मक निवडणुका घेऊन सरचिटणीसपदी रीतसर नियुक्ती केली जाईल, असा निर्णयही पक्षाने जाहीर केला आहे.
त्याचवेळी पक्षाची सोमवारची सभा होऊ नये, या पनीरसेल्वम यांच्या मागणीवर न्यायालयाने निर्णय देण्याच्या आधी, चेन्नईतील पक्ष मुख्यालयाबाहेर पक्षाच्या दोन गटांत संघर्ष झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मद्रास हायकोर्टाने राजकीय पक्षाच्या भांडणात हस्तक्षेप न करण्याबाबत न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत AIADMK नेते आणि माजी समन्वयक ओ. पनीरसेल्वम यांची सर्वसाधारण परिषद सोमवारी बरखास्त करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे अण्णाद्रमुकच्या सर्वसाधारण सभेत समन्वयक आणि संयुक्त समन्वयक पद रद्द करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला आहे. तसेच अण्णाद्रमुकच्या जनरल कौन्सिलच्या बैठकीत पलानीस्वामी यांना पक्षाचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे, त्यांची हंगामी सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली आणि त्यांना पक्षाचे सरचिटणीस बनवले आहे.
Tamilnadu AIADMK Political movement Politics