इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तमिळनाडूच्या तंजावरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील एका मंदिरात उत्सवादरम्यान विजेचा धक्का लागून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मंदिरातून निघणाऱ्या रथयात्रेदरम्यान ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचेही समोर आले आहे.
तंजावर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कालीमेडू येथील अप्पर मंदिरात घडली. या मंदिरात ९४व्या अप्पर गुरुपूजा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात्रेतला रथ मंदिरातून निघून जेव्हा परत मागे येण्याची वेळ आली तेव्हा वर लावलेल्या तारांच्या जाळ्यामुळे रथ पुढे नेता येत नव्हता. रथ मागे फिरताच त्याचा वरच्या तारांशी संपर्क आला आणि संपूर्ण रथात विद्युत प्रवाह पसरला. या घटनेत तब्बल ११ जणांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तंजावर येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. सेंट्रल झोनचे आयजी व्ही बालकृष्णन आणि तंजावरचे एसपी रावली प्रिया जखमींना पाहण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. समोर आलेल्या अपघाताच्या छायाचित्रांमध्ये रथ पूर्णपणे जळताना दिसत आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या कार्यालयाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासोबतच अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. तिरुचिरापल्लीचे पोलिस महानिरिक्षक व्ही. बालकृष्णन यांनी सांगितले की, “याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेची सखोल चौकशी केली जाणार आहे. विद्युत तारांशी संपर्क येत असताना रथ मागे फिरवताना काळजी घेण्याची गरज होती. पण त्याविषयीचे गांभीर्य लक्षात न घेतल्याने ही भीषण घटना घडली आहे.” या दुर्घटनेबद्दल तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी दुःख व्यक्त केले आहे.