मुंबई – “ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच्या निधनामुळे तमाशा क्षेत्रातील सोनेरी पान हरपले”, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
“तमाशाचा कुठलाही वारसा नसताना त्यांनी स्वतःला मिळालेल्या कलेच्या दैवी देणगीच्या जोरावर अत्यंत परिश्रमाने तमाशा क्षेत्रात स्वतःचे नाव निर्माण केले होते. तमाशात पुरुष भूमिका सहजतेने साकारणाऱ्या कांताबाईंनी महिला प्रेक्षकांना तमाशाकडे खेचून आणले. आपल्या उत्तम गायन, नृत्य आणि अभिनयातून त्यांनी तमाशाला पांढरपेशा समाजातही मानाचे स्थान मिळवून दिले होते. तमाशा क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी महाराष्ट्र शासनातर्फे पहिला विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान करण्यात आला होता. त्यांचा वारसा पुढे नेणारे त्यांचे पुत्र रघुवीर, कन्या आणि सर्व कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे”, असेही देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.