इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– स्वयंपाकघरातील वनस्पती –
चिंच
चिंच. संस्कृत नाव अम्लिका ,हिंदी इमली , इंग्रजीत tamarind. आंबट गुणधर्म असलेल्या चिंचेचे खुप सारे महत्त्व आहे. आपल्या अनेकांना झाडावरच्या चिंचा तोडण्याचा अनुभव असेल. खासकरुन सुटीत गावी गेल्यावर चिंचा तोडण्याचा एक खेळच असायचा. याच चिंचेविषयी आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
चिंचेचा १५ ते १६ मीटर उंचीची मोठा वृक्ष असतो. सर्व भारतभर आढळतो. याला ज्या शेंगा येतात त्या म्हणजे चिंचा. कच्च्या असतांना हिरव्या असतात. पिकल्यावर वरचे टरफल सुटे होते. आत मऊ लालसर रंगाची चिंच असते. कच्ची हिरवी चिंच , कोवळी पाने, फुले आणि पिकलेली चिंच , चिंचोके ( चिंचेचे बी) असे सर्व भाग वापरले जातात.
गुण:-
कच्ची चिंच –
ही हिरवी असते. उष्णता व कोरडेपणा वाढवते. चवीला आंबट तुरट असते .ती वात कमी करते,पण जास्त प्रमाणात खाल्ल्यास पित्त व कफ वाढवते. तसेच मलावष्टंभ करते.
पिकलेली चिंच :-
हीच जास्त वापरली जाते. ही पण चवीला आंबट, गोड असते. भूक वाढवणारी, तोंडाला चव आणणारी आहे.
पित्त , कफ व वात हे तिन्ही दोष कमी करते. ही मलावष्टंभ नाहीसा करते.
चिंचेत विविध अम्ले असतात, त्यातही टार्टरिक आम्ल जास्त असते.
चिंचेचे विविध उपयोग :——-
१) चिंचेच्या पानांचा व चिंचोक्याचा लेप सूज कमी करतो.
२) भूक न लागणे ,यकृत विकार यात चिंच उपयोगी पडते.
३) चिंचेच्या टरफलांचा क्षार पोटदुखी , पोटफुगी यात उपयोगी पडतो. आयुर्वेदातील शंखवटी नावाच्या औंषधात तो वापरला जातो.
४) खूप सारखी सारखी तहान लागणे ,उलटी होणे ,पित्ताने उलटी होणे यामध्ये चिंचेचे पानक म्हणजेच विशिष्ट पद्धतीने केलेले सरबत खूप उपयोगी पडते. चढलेली भांग पण या सरबताने उतरते. उष्माघातात पण हे सरबत खूप गुणकारी आहे. मूत्रदाह पण याने कमी होतो.
५) बिब्बा अंगावर उठून होणारी खाज, आग ही चिंचेच्या गराच्या लेपाने किंवा पाल्याच्या रसाने दूर होते.
६) अतिसारात चिंचेची कोवळी पाने वाटून त्याची चटणी देतात.
७) चिंचोके वस्रोद्येागात वापरतात.
८) स्वयंपाकात चिंच वापरली जाते, आमटी भाजी त्यामुळे स्वादीष्ट बनते. पचायला हलकी होते. अळूच्या भाजीत , वड्यात चिंच आवर्जून वापरली जाते. अळूमधील ॲाक्झालीक ॲसिड त्यामुळे त्रासदायक होत नाही.
९) आधुनीक संशोधनातून असे निष्कर्ष पुढे आलेत कि चिंचेत मोठ्याप्रमाणावर ॲंटीॲाक्सीडंट आणि सूज कमी करणारी द्रव्ये आहेत त्यामुळे ह्रदयरोग, कॅन्सर , डायबेटिस यापासून संरक्षण मिळू शकते.
१०) चिंचेत मोठ्याप्रमाणात लोह व मॅंगेनीज असते. चिंच LDL cholesterol आणि Triglycerides कमी करते.
लक्षांत ठेवा :———
स्वयंपाकात १ वर्षे जुनी चिंच वापरा. योग्य प्रमाणात वापरा. जास्त प्रमाणात वापरल्यास पित्त होणे , जळजळ होणे, डोके दुखणे ही लक्षणे दिसतात. तसेच चिंच असलेले पदार्थ उत्तमप्रतीच्या स्टीलच्या भांड्यातच करावे. पितळी, लोखंडी किंवा तांब्याच्या भांड्यात करू नये.
सांगलीचे एक दातारशास्री म्हणून जुने वैद्य होते. ते चिंच व मीठ वापरून विशिष्ट पद्धतीने केलेले तेल मलावष्टंभ , वातरोग यात वापरत. गोडसर वासाचे हे तेल खूपच गुणकारी ठरते. पोटातून घेणे जास्त फायद्याचे ठरते.
पाककृती
चिंचापानक :-
चिंचेचा कोळ १ कप , पाणी १६ कप , खडीसाखर , सैंधव , जिरेपूड चवीप्रमाणे.
पाणी व कोळ एकत्र करून घ्यावा . त्यात बाकीची द्रव्ये टाकावी. रविने चांगले घुसळावे. छोट्या मातीच्या भांड्यात गार करावे .
१ कप प्यायला द्यावे. खूप आवडले तरी प्रमाणातच प्यावे.
डॉ. नीलिमा हेमंत राजगुरु
आयुर्वेदाचार्य
मो. 9422761801.
ई मेल – drneelimarajguru@gmail.com
Tamarind Plant Importance Nutrition by Neelima Rajguru