इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वातील कलाकार हे त्यांच्या प्रोफेशनल लाईफसोबतच लव्ह लाईफमुळे चर्चेत असतात. बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा हे यातीलच काही कलाकार. बऱ्याच दिवसांपासून या दोघांची नावे एकमेकांशी जोडली जात आहेत. दोघे एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अनेकवेळा दोघेही एकत्र दिसले आहेत. जेव्हा-जेव्हा दोघांना एकत्र स्पॉट केले जात होते, ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे चाहतेही म्हणत होते. आता स्वतः तमन्नानेच यावर मौन सोडले आहे.
तमन्नाने दिली हिंट
नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्री तमन्ना म्हणाली की, ‘केवळ तुमचा सहकलाकार असल्याने तुम्ही कोणाकडे आकर्षित होता, असे मला वाटत नाही. माझे अनेक सहकलाकार आहेत. जर एखाद्याला कोणासाठी काही वाटत असेल, तर ते नक्कीच वैयक्तिक आहे. मग तो जे काम करतो त्याच्याशी काहीही संबंध नाही.’ यातच तमन्ना विजयबद्दल सांगते की, ‘तो जसा माणूस आहे, तसा माणूस मला माझ्या आयुष्यात खरोखर हवा आहे. त्याच्याशी माझे चांगलं ट्युनिंग आहे. जेव्हा तुम्ही जोडीदाराच्या शोधात असता, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीनुसार स्वतःमध्ये बरेच काही बदल करावे लागते. पण मी स्वत:साठी एक जग तयार केले आहे आणि विजय अशी व्यक्ती आहे, जो मला मी आहे तसा स्वीकारतो. तमन्नाने हे सांगितल्यानंतर तमन्ना चर्चेत आहे. विजय सोबतच्या नात्यावर तिने शिक्कामोर्तब केले आहे.
दरम्यान, विजयला यावरून अनेकदा चिडवण्यात आलं होतं, पण तो नात्याबद्दल कधीच स्पष्टपणे बोलला नव्हता.