मालेगाव – तालुक्यातील तळवाडे येथील ग्रामपंचायतने मजुरांबाबत एक नियमावली तयार केली असल्याची पोस्ट सोशल मिडीयात व्हायरल झाली आहे. मजुरांना किती रोजगार द्यावा याच बरोबर इतर गावात मजुरी करण्यात स्थानिक मजुरांना बंदी घालण्यात आली आहे. नियम मोडल्यास अकरा हजार रूपये आर्थिक दंड करत किराणा व दळण बंद करून सामाजिक बहिष्कार टाकण्याची तंबी देण्यात आली आहे. असे घटनाबाह्य नियम करणाऱ्या तळवाडे ग्रामपंचायतीवर सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तळवाडे, तालुका मालेगाव येथील ग्रामपंचायतीने परिसरातील गोरगरीब स्त्री-पुरुषांच्या शेतमजुरी बाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि देशाच्या घटनेला आव्हान ठरेल, असा अन्यायकारक लेखी ठराव केलेला आहे .राज्यघटनेतील स्री -पुरुष समानतेला छेद देणारा हा ठराव असून ,जो कोणी ग्रामस्थ याच्या विरोधात वागेल त्याला आर्थिक दंड करून,बहिष्कृत करण्याची ठरावात तंबी देण्यात आलेली आहे. हा संपूर्ण ठरावच बेकायदेशीर असून, भारतीय राज्यघटनेची पायमल्ली करणारा आहे.म्हणून संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सर्व सदस्यांवर सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा तसेच अन्य आवश्यक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर डॉ. ठकसेन गोराणे ,कृष्णा चांदगुडे,राजेंद्र फेगडे, अॅड. समीर शिंदे प्रल्हाद मिस्त्री, महेंद्र दातरंगे, विजय खंडेराव यांच्या सह्या आहेत.