नाशिक – राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात तालुका कृषी अधिकारीच लाच घेताना पकडला गेला आहे. पेठ येथील तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे (वय ५७) याला अँटी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले.
पगारे हा लाच मागत असल्याची तक्रार एसीबीला प्राप्त झाली होती. करंजाळी येथील कृषी सेवा केंद्रातील खते, बियाणे, कीटकनाशके यांचा स्टॉक योग्य असल्याचे दाखविणे आणि परवाना नुतनीकरणास अडचण न येवू देण्यासाठी पगारे याने पाच हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार, एसीबी पथकाने सापळा रचला. त्यात पगारे हा रंगेहाथ सापडला. त्यामुळे पगारे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाने सर्व पुरावे गोळा केले आहेत.
अँटी करप्शन ब्युरोचे पोलिस अधिक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक सतीश डी.भामरे प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक, सापळा अधिकारी अनिल बागूल, जयंत शिरसाठ, किरण अहिरराव, अजय गरुड, नितीन कराड, प्रभाकर गवळी आदींनी कारवाईत सहभाग घेतला.