मुंबई – रायगड जिल्ह्यातील तळीये गावातील सर्व सातही वाड्यांमधील एकूण 261 घरांची पुनर्बांधणी म्हाडाने विहित काल मर्यादेत ‘प्री-फॅब’ पद्धतीने पूर्ण करावी, असे निर्देश गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले. तळीये गावाच्या पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयात गृहनिर्माण मंत्री डॉ.आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योग राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री कु.अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
गृहनिर्माण मंत्री डॉ.आव्हाड म्हणाले,तळीये गावातील घरांच्या पुनर्बांधणीसाठी मदत व पुनर्वसन विभागाने म्हाडास जागा उपलब्ध करून द्यावी.तसेच तेथे रस्ते,वीज,पाणी,शाळा,अंगणवाडी, समाजमंदिर,ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाने म्हाडास आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा.त्यानुसार म्हाडाने लेआऊट तयार करून त्याचा विकास एजन्सी म्हणून करावा. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी पुढील आठवड्यात तळीये येथे जाऊन जागेची पाहणी करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर,मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता,रायगडच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष मुख्याधिकारी योगेश म्हसे, म्हाडाच्या कोकण मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. नितीन महाजन, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी अरुण डोंगरे,उपसचिव सुनील तुंबारे उपस्थित होते.