तिरुअनंतपुरम – केरळमध्ये तालिबान समर्थकांची संख्या वाढत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.जमात-ए-इस्लामी हिंद (जेआयएच) ही संघटना कट्टरतावाद आणि सांप्रदायिकतेला कथितरित्या पाठिंबा देत असल्याने सत्ताधारी भारतीय कम्युनिस्ट पार्टीने (मार्क्सवादी) चिंता व्यक्त केली आहे. पक्षाअंतर्गत कागदपत्रावरून ही बाब उघड झाली आहे. ही कागदपत्रे पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांमध्ये वाटली होती.
कागदपत्रांनुसार जमात-ए-इस्लामी हिंद सांप्रदायिक भावना भडकावण्याचे काम करत आहे. आपला अजेंडा राबविण्यासाठी जमात सोशल मीडिया आणि प्रकाशनांचा वापर करत आहे. इस्लामिक राज्य स्थापन करण्याची जमातची इच्छा आहे.
सीपीएमच्या दस्तावऐवजात केलेल्या दाव्यानुसार, मुस्लिम समाजासह इतर धर्मांच्या नागरिकांमध्ये आपले विचार पसरविण्याचे काम जमात करत आहे. ख्रिश्चन समाजाला मुस्लिमांविरुद्ध भडकावण्याचे प्रयत्नही केले जात आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार केरळमध्ये २६ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. मुस्लिम समाजासह जगभरात तालिबानची निंदा केली जात असताना केरळमध्ये तालिबानच्या समर्थनाचे कृत्य केले जाणे ही गंभीर आणि चिंताजनक गोष्ट आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, शिकलेल्या महिलांना या विचारधारेकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सीपीएमने याबाबत जमातवर आरोप केले आहेत. सांप्रदायिकतेविरुद्ध एकजूट होण्याचे आवाहन सीपीएमने आपल्या संघटना आणि कार्यकर्त्यांना केले आहे.
संघ परिवाराकडून सुरू असलेल्या उपक्रमांमुळे अल्पसंख्यकांमध्ये सांप्रदायिकतेची भावना वाढीस लागत असल्याचा आरोप सीपीएमने या कागदपत्रांमध्ये केला आहे. मुस्लिम युवक आणि विद्यार्थी कट्टरतावाद आणि दहशतवादी उपक्रमांकडे आकर्षित होण्यास संघ परिवाराचे उपक्रम कारणीभूत आहेत असा आरोप पोलिट ब्युरोचे सदस्य एम. ए. बेबी यांनी इंडिया टुडे वाहिनीशी बोलताना केला.
जमातने आरोप फेटाळले
जमात-ए-इस्लामी हिंद संघटनेने या आरोपांना आणि दाव्यांना फेटाळून लावले आहे. जमातचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहम्मद सलीम इंजिनिअर म्हणाले, की जमात-ए-इस्लामी हिंदबाबत चुकीच्या धारणा बनविल्या जात आहेत. राजकीय फायदा घेण्यासाठी किंवा राजकीय लाचारी स्वीकारण्यासाठी असे प्रकार केले जात आहेत. सांप्रदायिक आणि विभाजनवादी वृत्तीविरोधात जमातचा अजेंडा आहे. तालिबानला पाठिंबा देण्याची भावना वाढविण्याचा आरोप फेटाळत हा अपप्रचार असल्याचे जमातने म्हटले आहे.