काबूल – अफगाणिस्तानात तालिबानी सरकार लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी अद्यापही दहशत निर्माण करत असून त्यासाठी अत्यंत क्रूर पद्धतीने नागरिकांना ठार केले जात आहे, इतकेच नव्हे तर त्यांचे मृतदेह भरचौकात टांगून ठेवलेले जात आहेत.
तालिबान पोलिसांनी पश्चिम अफगाणच्या हेरात प्रांतातील विविध चौकांत तालिबान पोलिसांनी चार लोकांना गोळ्या घालून ठार केले. तसेच प्रथम शहराच्या मुख्य चौकात हे चार मृतदेह क्रेनने रस्त्याच्या मध्यभागी तासन्तास लटकवून ठेवले. हेरात शहराचे नागरिक व प्रत्यक्षदर्शी वजीर अहमद सिद्दीकी यांनी सांगितले की, कथित तालिबानी पोलिसांनी चार मृतदेह चौकाचौकात आणले आणि एक मृतदेह क्रेनच्या मदतीने लटकवला. हा मृतदेह तासन्तास हवेत लटकलेला राहिला. तसेच मृताच्या गळ्यात एक फलकही लटकलेला होता. पश्तो भाषेत त्यावर काहीतरी लिहिले होते. उरलेले तीन मृतदेह तालिबान्यांनी हेरातच्या दुसऱ्या चौरस्त्यावर लटकवले गेले.
अशा कारवाईबाबत तालिबानचे म्हणणे आहे की चुकीच्या कृत्याबद्दल लोकांच्या मनात भीती आणि धाक निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची शिक्षा आवश्यक आहे. जेणेकरून लोक चुकीचे काम करण्यापूर्वी हजार वेळा विचार करतील. तसेच चुकीच्या कामासाठी शिक्षा दिली पाहिजे.