मुंबई – अमेरिकेचे सैन्य मायदेशी परतल्यानंतर तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या सर्वसामान्य नागरिकांचे दमन सुरू केले आहे. आता जुन्या पाच वर्षांच्या कार्यकाळात तालिबान्यांनी जे शोषण करणारे, अन्यायकारक नियम लागू केले होते, तेच नियम आता पुन्हा एकदा जनतेसाठी लागू करण्यात आले आहेत. १९९६ ते २००१ या कालावधीतही नागरिकांना याच पद्धतीचा त्रास सहन करावा लागला होता.
तालिबानी मुलांसोबतच आपल्या मुलींची लग्न लावून द्यावी लागतील, असे आदेश त्यांनी अफगाणिस्तानातील नागरिकांना दिले आहेत. पुरुषांना दाढी वाढविण्याचे आणि मशिदीत जाण्याचे आदेश दिले गेले आहेत. पूर्वीच्या राजवटीत महिलांना कामावर जाणे, मुलींना शाळेत जाणे किंवा पुरुषाशिवाय घरातून बाहेर पडण्यावर बंदी होती. पुरुषांना दाढी वाढविणे आणि टोपी किंवा पगडी घालण्यासाठी बळजबरी केली जायची. संगीत किंवा करमणुकीच्या कार्यक्रमांवर बंदी होती. त्याचे पालन केले नाही तर सार्वजनिकरित्या मारले जायचे किंवा अपमानित केले जायचे. नियम न पाळणाऱ्या महिलांची तर हत्याही केली जायची.
तालिबान्यांनी ताब्यात घेतलेल्या भागांमध्ये इस्लामी शरिया कायद्यानुसार परिभाषित दमनकारी कायदा व धोरणे पुन्हा एकदा लागू करायला सुरुवात केली आहे. तालिबान्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. ते केवळ सरकारला पराभूत करून अफगाणिस्तानात आपली मनमानी करण्यासाठी आतूर आहेत, असे एका पत्रकाराने नमूद केले आहे.
अफगाणिस्तानचे पंतप्रधान अहमदजाई यांनी महिलांवरील हिंसा कमी करण्याचे आश्वासन तालिबानी नेतृत्वाने दिल्याचे म्हटले आहे.
महिलांमध्ये भिती
तालिबान्यांच्या अन्यायाने त्रस्त महिलांमध्ये भिती निर्माण झाली आहे. महिलांना पुन्हा एकदा भूतकाळातील अत्यंत वाईट दिवसांचा पुन्हा एकदा सामना करावा लागू शकतो, अशी भिती व्यक्त होत आहे.