कंदहार (अफगाणिस्तान) – सर्व जगात सध्या अफगाणिस्तानमधील दडपशाही सत्तांतराची चर्चा सुरू असून तालिबानी राजवटीला येथे प्रारंभ झाल्याने जगभरात खळबळ माजली आहे. तालिबानी राजवटीमुळे पुन्हा एकदा दहशतवादी संघटनांचा जोर वाढलेला दिसून येत आहे. अफगाणिस्तानच्या कंदहार शहराला तालिबानने आपले केंद्र बनवले आहे. तालिबानने आता जवळपास २० वर्षांनंतर पुन्हा एकदा कंदहार शहराचा ताबा घेतला आहे.
अफगाणिस्तानात आता दडपशाहीचे युग सुरू झाले आहे. लोकांना त्यांच्याच देशात भीतीने जगण्यास भाग पाडले जात आहे. ‘आम्ही बदललो असून सर्वांना माफ केले आहे. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.’ असे तालिबान सांगत असले तरी त्यावर बहुतांश जणांचा विश्वास नाही. कारण तालिबान अजूनही लोकांवर त्याच प्रकारे अत्याचार करत आहे. त्यातच जलालाबादमध्ये तालिबानी कार्यकर्त्यांनी निदर्शकांवर गोळीबार केल्यानंतर तीन जण ठार झाले आणि १२ जण जखमी झाले आहेत.
राजधानी काबूलपासून ११५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जलालाबादमधील पश्तूनस्तान स्क्वेअरमध्ये ही चकमक झाली. यावेळी स्थानिक लोकांनी तालिबानी झेंडा शहरातील एका चौकात काढला. कारण येथे पूर्वी अफगाण सरकारचा काळ्या, लाल आणि हिरव्या झेंडा लावलेला होता. विशेष म्हणजे जलालाबादमधील या घटनेच्या व्हिडिओमध्ये, गर्दीच्या रस्त्यावर लागोपाट गोळ्या झाडल्या जात आहेत हे दिसून येत असून त्यानंतर स्थानिक लोक जीव वाचवण्यासाठी धावत होते. गोळीबार करणारे सशस्त्र लोक तालिबानी लढाऊ होते जे नंतर जमावावर लाठीचार्ज करताना दिसले.
दुसर्या व्हिडिओमध्ये, आंदोलक आधीच्या अफगाण सरकारचा झेंडा फडकवताना दिसतात. तालिबानच्या सैनिकांनी जलालाबादमधील जमावावर गोळीबार केला की नाही ? याविषयी तालिबानने अद्याप निवेदन जारी केलेले नाही. परंतु रविवारी काबूल ताब्यात घेतल्यापासून तालीबानी सैनिक पूर्वीचे काळे, लाल आणि हिरवे झेंडे काढत आहेत आणि त्यांच्या जागी काळ्या रंगाचा पांढरा तालिबानी झेंडा लावत आहेत. तालिबानचे अनेक लढाऊ सैनिक तालिबानचा झेंडा काबूलसह अफगाणिस्तानातील प्रमुख इमारतींवर फडकवताना दिसतात.
एका अहवालानुसार तालिबान आधीच्या तुलनेत अधिक सशक्त झाला आहे. तालिबानमध्ये जवळपास ८५ हजार दहशतवादी आहेत. दोन दशकानंतर अफगाणिस्तानमधून अमेरिकेने माघार घेण्याचे जाहीर केले, तेव्हाच अमेरिकेची ही घोषणा आपला विजय असल्याचे तालिबानने म्हटले होते. अफगाणिस्तानला जवळपास तीन दशके युद्धभूमी बनवणाऱ्या तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतली आहे. या घटनेचे जगभरात तीव्र पडसाद उमटत आहेत.