काबूल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्यानंतर विरोध करणाऱ्यांना तालिबानने माफी जाहीर केली आहे. शरिया कायद्यानुसार महिलांच्या अधिकारांचा सन्मान केला जाईल, असे ठोस आश्वासन तालिबानचा प्रवक्ता जबीमुल्ला मुजाहिद याने दिले आहे. तालिबानकडून प्रथमच पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करण्यात आली.
सुरक्षित अफगाणिस्तानाची घोषणा तालिबाने केली असली तरी ही घोषणा जगातील नेत्यांना आणि भयभीत झालेल्या लोकांना दिलासा देण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून याकडे पाहिले जात आहे. यापूर्वी बंडखोरांच्या माध्यमातून किंवा लपून-छपून तालिबानकडून निवेदन प्रसिद्ध केले जात होते. १९९० च्या दशकातील तालिबानच्या शासनादरम्यान महिलांचे जीवन आणि अधिकारांवर कठोर निर्बंध घालण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर तालिबानचे आताचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. खासगी माध्यमांनी स्वतंत्र राहावे, असे सांगताना पत्रकांरांनी देशांच्या मूल्यांविरोधात काम करणे थांबवावे असा इशाराही त्यांनी दिला आहे.
अफगाणिस्तानला बंडखोर (तालिबान) सुरक्षित ठेवतील. ज्या लोकांनी मागील सरकार किंवा परदेशी सरकारांसोबत किंवा सुरक्षा दलांसोबत काम केले आहे, त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे मुजाहिद यांनी सांगितले. इतर देशांशी शांततापूर्ण संबंध ठेवण्याची इच्छाही तालिबानने व्यक्त केली आहे.
तालिबान प्रवक्त्याने सांगितले की, त्यांनी मदत का केली हे विचारायला कोणीही त्यांच्या घरी जाणार नाही. तालिबानचे सांस्कृतिक आयोगाचे सदस्य इमानुल्लाह समनगनी यांनी आश्वासन देताना सांगितले की, तालिबान कोणतेही कारण न विचारता माफी देणार आहे. महिलांना सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे. अफगाणिस्तान कोणत्याही देशावर हल्ला करण्यासाठी आपल्या जमिनीचा वापर करण्याची परवानगी देणार नाही. २०२० मध्ये अमेरिकेसोबत झालेल्या करारात तालिबानने याबाबत आश्वासनही दिले होते. या करारानंतर अफगाणिस्तानातून अमेरिकी सैनिकांच्या माघारीचा रस्ता मोकळा झाला होता.
परदेशी नागरिकांनी घाबरू नये
गेल्या शासनाचा अनुभव असल्याने अफगाणिस्तानचे नागरिक भयभीत झाले आहेत. तालिबानच्या क्रूर शासनात पुन्हा राहावे लागेल याच भीतीने नागरिक धावपळ करत आहेत. स्थानिक नागरिकांसह परदेशी नागरिकांनी कुठेच जाण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोणावरही हल्ला केला जाणार नाही
आपल्या शत्रूंवर हल्ला केला जाणार नाही, असे तालिबानने स्पष्ट केले असले तरी मागील सरकारला मदत करणाऱ्या लोकांची त्यांच्याकडे यादी असून ते त्यांना शोधत आहे, असेही बोलले जात आहे. तालिबानने ताबा मिळविल्यानंतर जर्मनीने अफगाणिस्तानला दिली जाणारी आर्थिक मदत थांबविली आहे.
सरकार स्थापनेबाबत चर्चा
अफगाणिस्तानातील भविष्यातील सरकारचे गठण करण्यासाठी कतारची राजधानी दोहा येथे तालिबानची चर्चा सुरू आहे. त्यामध्ये सरकारची रचना आणि नावांवर चर्चा होत आहे. लवकरच सविस्तर माहिती खुली केली जाईल. तालिबानच्या एका उच्च पदस्थ अधिकार्याने टोलो न्यूजला सांगितले, की त्यांचे नेतृत्व दोहामध्ये चर्चा करण्यात व्यग्र आहे. आंतरराष्ट्रीय तसेच अफगाणिस्तानच्या राजकीय दलांच्याही संपर्कात आहे.