गुवाहाटी – अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट प्रस्थापित झाल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत जम्मू-काश्मीरमध्येही त्याचा छुपा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी एका कार्यक्रमात अफगाणिस्तानातील परिस्थितीबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे.
रावत म्हणाले की, आज अफगाणिस्तानमध्ये जे काही घडत आहे त्याचा परिणाम उद्या जम्मू-काश्मीरवर होऊ शकतो. यासाठी आपण भारतीयांनी तयार असले पाहिजे. तसेच आम्हाला देशाच्या सीमा सील कराव्या लागतील, आता डोळ्यात तेल घालून देखरेख करणे खूप महत्वाचे झाले आहे. बाहेरून कोण येत आहे, हे पाहण्यासाठी आपल्याला आपले डोळे उघडे ठेवावे लागतील. तसेच कडक तपासणी करावी लागते आहे.
जनरल रावत पुढे म्हणाले की, जगावर सत्ता मिळवण्याच्या चीनच्या जागतिक दर्जाच्या महत्त्वाकांक्षांमुळे दक्षिण आशियाची स्थिरता सर्वत्र धोक्यात आहे. उदयोन्मुख जागतिक महासत्ता म्हणून चीन आपले स्थान मजबूत करण्यासाठी दक्षिण आशिया आणि हिंदी महासागर क्षेत्रात खोलवर गुप्त कारवाया करत आहे. चीनचे म्यानमार आणि पाकिस्तानसोबतचे संबंध आणि बांगलादेशवर त्याची प्रतिकूल कारवाई देखील भारताच्या हिताची नाही. चीनकडून सर्वाधिक लष्करी उपकरणे मिळवणारे म्यानमार आणि पाकिस्तान जागतिक व्यासपीठावरुन समर्थन मिळवतात.
भारत-पाक संबंधांवर त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान सरकार पुरस्कृत दहशतवाद दोन्ही देशांमधील शांतता प्रक्रियेत अडथळा आहे. चीनची पाकिस्तानसोबतची भागीदारी आणि जम्मू-काश्मीरबाबतची त्याची भूमिका ही भारतविरोधी भागीदारी म्हणून वाईट प्रकारे पोसली केली जाऊ शकते, असेही रावत म्हणाले.
गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा परिस्थितीचाही आढावा घेतला आहे. वास्तविक, गेल्या महिनाभरात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. माथेफिरू नागरिकही आता दहशत निर्माण करण्यासाठी शांतता प्रेमी नागरिकांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे दहशतवादी घटनांमध्ये अचानक झालेली ही वाढ खरे म्हणजे अफगाणिस्तानातील बदललेल्या परिस्थितीशीही जोडली जात आहे.